बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत दुसऱ्या बाजूने सुरु असलेल्या गटाराच्या बांधकामावरुन काल शुक्रवारी झालेल्या रस्ता रुंदीकरणाचे अधिकारी व व्यापारी यांच्यातील सभेत हमरीतुमरी झाल्याचे पहायला मिळाले. या गटाराला काहीं व्यापाऱ्यांचा विरोध असला तरी महामार्ग अधिकाऱ्यांनी केलेल्या रेखांकानुसारच या गटाराचे काम व्हावे, अशी भूमिका जमीनमालकांनी घेतल्याने या गटार बांधकामाचा विषय शृंगारतळी परिसरात चर्चेचा ठरला आहे.

शृंगारतळी बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणानंतर एका बाजूने गटाराचे बांधकाम पूर्णतः करण्यात आले मात्र, दुसऱ्या बाजूच्या गटाराचे बांधकाम करण्यात आलेले नव्हते. सध्या या दुसऱ्या गटाराचे बांधकाम सुरु झाले आहे. नेमके याच बांधकामावरुन काही व्यापाऱ्यांनी आपली आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत शुक्रवारी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गुहागर-विजापूर महामार्ग अधिकारी व व्यापारी यांच्यात बैठक झाली. यावेळी सरपंच संजय पवार यांच्यासह प्रमुख व्यापारी उपस्थित होते. यावेळी काही व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यालगत प्रथम गटार बांधावे त्याच्या बाजूला फूटपाथ बांधावे अशी आग्रही मागणी केली तर काहींनी रस्यापासून अंतर सोडून गटार बांधावे अशी भूमिका घेतली. त्यामुळे बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्था, लहान-मोठे स्टाँलधारक, हातगाडीवाले, बांगडीवाले यांची विक्रीसाठी बसण्याची व्यवस्था होईल. तसेच बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचाही विषय सुटेल असे मत मांडले.
दरम्यान, या गटाराचे बांधकाम सरपंचांनी थांबवले असे काही व्यापाऱ्यांनी या सभेत उपस्थित केल्याने व्यापारी व सरपंच यांच्यात खडाजंगी झाली. याचे पर्यवसान अश्लील भाषा वापरण्यात झाले. यावेळी सरपंच पवार यांनी गटाराचे काम महामार्गाच्या रेखांकानुसार व्हावे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे शृंगारतळीतील गटाराच्या बांधकामावरुन अनेकांच्या गटांगळ्या झाल्याचे पहायला मिळाले.


महामार्ग अधिकारी चिडीचूप
या सभेत महामार्ग अधिकारी चिडीचूप असल्याचे पहायला मिळाले. ज्यावेळी काही व्यापाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली त्यावेळी अधिकारी बघ्याच्या भूमिकेत होते. गटाराच्या बांधकामाच्या उद्भवलेल्या वादावरुन काहीतरी मार्ग काढावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती. मात्र, ती फोल ठरल्याचे दिसून आले.
प्रतिक्रिया- महामार्गाच्या गटाराचे काम रेखांकानुसारच होणार अशी ठाम भूमिका आम्ही घेतली असून कुणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही आमचे काम ठरलेल्या पध्दतीनुसारच करणार आहोत. तसेच पावसाळ्यानंतरच पालपेणे फाट्यावरील पुलाचे काम केले जाणार आहे.


एन.ए. शेख
अभियंता, गुहागर-विजापूर महामार्ग
स्व. सुशील वेल्हाळ यांनी यापूर्वी शृंगारतळी बाजारपेठेत रस्ता रुंदीकरण करुन घेतले होते. त्यामुळे भविष्याच्यादृष्टीने विचार करुन आताच्या रुंदीकरणाला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती आहे.
वैभव वेल्हाळ, नागरिक शृंगारतळी


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here