गुहागर – भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस निलेश राणे गुहागर दौऱ्यावर येणार समजल्यावर येथील आमदारांना कोरोनाची लागण तीव्र झाली. जर येथील जनतेसाठी उपचार घेण्यासाठी तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल उभे राहण्यासाठी निवडून आलेल्या तीन टर्ममध्ये प्रयत्न केले असते तर आज स्वतःच्या कोरोना उपचारासाठी मुंबईत जावे लागले नसते असा टोला भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी आम. भास्कर जाधवांना मारला. शृंगारतळी येथील भवानी सभागृहात आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
गुहागर हा भाजपचा बालेकिल्ला आहे त्यामुळे हा बालेकिल्ला मजबुत करून तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सज्ज व्हा आपण त्यासाठी नेहमी आपल्या सोबत आहोत असे बळ त्यांनी गुहागरातील कार्यकर्त्यांमध्ये भरले. यावेळी पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले की,गुहागर तालुका ओसाड पडला आहे.तालुक्याचा विकास करण्यासाठी तेथील आमदार दूरदृष्टी असलेला पाहिजे मात्र इथला आमदार दूरदृष्टीचा नाही.तीन टर्म निवडून आले पण विकासाच्या नावाने बोंबा, सत्तेत असूनही सभागृहात गुहागरचा साधा विषय नाही.तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल नाही तीन वेळा निवडून येऊनही जनतेसाठी यांनी ही सुविधा केली नाही.कोरोनात मुंबईकराना कोकणात बोलावले मात्र चाकरमानी गावी आल्यावर हे गायब झाले असाही चिमटा त्यांनी यावेळी भास्कर जाधवांना काढला.हे राहतात चिपळूणला आणि गुहागरात बस्तान बसवतायत. आता म्हणे मुलाला उभे करणार,मोदी साहेबांचे अनुकरण भर सभागृहात हे करतात.जर आमच्या सर्वोच्च नेत्याला जर डिवचले जात असेल तर त्याचा वचपा हा काढणारच असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले,आपण आरपारची लढाई करतो.यांच्यासारखे खोटी कामे करत नाही.हे वर्गणीचोर आहेत दुसऱ्याने केलेल्या कामाला स्वतःची पाटी लावायला मागेपुढे पाहणार नाहीत.दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घ्यायला नेहमीच तयार असतात.विकासावर हे बोलू शकत नाहीत आणि दर्जेदार कामही करू शकत नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागात नेटवर्क नाही.रस्ता रुंदीकरण रखडलेले नेमका काय विकास या माणसाने केला ते दाखवा! साधं मंत्रिमंडळात पण यांना संधी नाही कारण उद्धव ठाकरेंना पण यांची पात्रता कळली.फक्त घाईघाईत भाषणे ठोकायची आणी मोठी अश्वासने द्यायची एवढंच काम हे करू शकतात.त्यामुळे हे कसले शेठ आणि कुठले शेठ असा खोचक टोला त्यांनी आम.जाधवांना लगावला.
गुहागरमध्ये भाजपचे गतवैभव पुन्हा मिळवून द्या
यावेळी निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,सर्वात चांगल काम गुहागरमध्ये संघटनेचे सुरू आहे.अनेक जण नाराज आहेत त्यांना संधी द्या,पारंपरिक भाजपचा मतदारसंघ आहे तो पुन्हा जोमाने उभा करा त्यासाठी आंदोलने उभी करावी लागतील.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती हातात घ्यायची असेल तर रस्त्यावर उतरा आणि जो येईल त्याला सोबत घेऊन चला.महाराष्ट्र राज्यात जे सरकार बसल आहे ते लूटमार करणार आहे.जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जोरदार प्रयत्न करा आपण त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. स्किल डेव्हलपमेंटसाठी मी पुढाकार घेईन येथील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. या कार्यक्रमात शीर,साखरीआगर,मासू आदी गावातील नागरिकांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला
यावेळी व्यासपीठावर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर, दक्षिण रत्नागिरी उपाध्यक्ष रवींद्र नागवेकर,जिल्हा सरचिटणीस मंगेश जोशी,उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे,सरचिटणीस सचिन ओक,महिला तालुकाध्यक्षा श्रद्धा घाडे,चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष मालप,अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष आसिफ दळवी,महिला उपाध्यक्षा नीलम गोंधळी,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संजय मालप,शहर युवा अध्यक्ष मंदार पालशेतकर,पंचायत समिती सदस्या स्मिता धामणस्कर,यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर यांच्यासह गुहागर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका ओबीसी मोर्चा प्रमुख दिनेश बागकर यांनी तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केले.