गुहागर -गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथे रात्रीच्या वेळेस घराचे दरवाजे ठोकणे, घरावर रेती, दगड फेकणे असे अनेक प्रकार गेली अनेक महिने सुरू आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
तवसाळ तांबडवाडीमध्ये रात्रीच्यावेळी घरावर होणारी दगडफेक, रेती पडणे, दरवाजे ठोकणे अशा घटनांमुळे गुढ, भितीमय वातावरण निर्माण झाले आहे. सुरवातीला कोणीतरी त्रास देण्याच्या उद्देशाने हा खेळ करत असेल अशी शक्यता वाटत होती. वाडीतील ग्रामस्थांनी काही दिवस रात्रीच्या वेळेस पहारा ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे उद्योग कोण करतो त्याचा पत्ता लागला नाही. रात्रीचा हा खेळ सतत सुरु झाल्याने लोकांच्या मनात वेगवेगळ्या कुशंका येवू लागल्या आहेत. येथील काही घरांमध्ये एकट्या स्त्रीया राहत असतात. पुरुष मंडळी कामानिमित्त मुंबईत वास्तव्याला आहेत. रात्रीच्यावेळी घरावर होणारी दगडफेक, रेती पडणे, दरवाजे ठोकणे या प्रकारांमुळे या महिला शेजारी पाजारी रहायला जावू लागल्या आहेत. अशावेळी भिती निर्माण करुन बंद घरात चोरी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सदर प्रकाराची माहिती तवसाळचे पोलीस पाटील, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य देण्यात आली. मात्र रोज सायंकाळपासून गुढ, भितीयुक्त वातावरणातून मुक्तता मिळावी म्हणून तवसाळ तांबडवाडीतील ५५ महिला पुरुष ग्रामस्थांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.