चिपळूण – महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा नवदुर्गा राज्यस्तरीय पुरस्कार सहकार क्षेत्रातील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना प्रशांत यादव यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांचा आदर्श नवदुर्गा म्हणून गौरव करण्यात आला.
वाईचे आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. राज्यातील हा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान दरवर्षी ८ मार्च या जागतिक महिला दिनी करण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे या पुरस्कारांचे वितरण रविवारी पाचगणी हिल स्टेशन महाबळेश्वर येथे झाले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील, सातारा जिल्हा पत्रकारासंघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर, सातारच्या नगराध्यक्ष माधवी कदम, विद्यानिकेतन शिक्षण समूहाच्या संचालिका स्वाती बीरामणे, आदर्श सरपंच डॉ. तेजस्विनी देसाई, कल्पवक्ष उद्योग समूहाचे अध्यक्ष भाऊ ढेबे, प्रसिद्ध रत्नशास्त्री ए.एच.मोतीवाला, रेल्वेबोर्ड संचालिका वैशाली शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, पाचगणीचे प्रसिद्ध उद्योजक प्रशांत मोरे, फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, महिला विभागाच्या अध्यक्षा मनीषा लोहार, चिपळूण तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, रोटरीचे रमण डांगे, खेर्डीचे सरपंच बाबू शिर्के, काँग्रेसचे महेश कदम, पतसंस्थेचे प्रशांत वाजे, अविनाश गुढेकर, महेश खेतले, स्वप्नील चिले उपस्थित होते.
राज्यभरात विस्तारित ५० हुन अधिक शाखांतून स्वप्ना यादव यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. याकामी त्यांचे वडील आणि संस्थेचे संचालक अध्यक्ष सुभाष चव्हाण, आई स्मिता चव्हाण व पती प्रशांत यादव यांची खंबीर साथ लाभत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच या पुरस्काराचे मानकरी झाल्याचे स्वप्ना यादव यांनी सांगितले.