गुहागर – मुस्लीम धर्मियांचा असणारा ईद हा सण कोणत्याही प्रकारचे गालबोट न लावता सर्वधर्मसमभावाने आनंदात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन गुहागरचे पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी शृंगारतळी व पाटपन्हाळेवासियांना केले.
ईद हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना आपत्ती आणि सुरु असलेले लाँकडाऊन यामुळे या सणावर काहीसे सावट असले तरी शासनाचे नियम पाळून तो साजरा करावा, असे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या सणाला गालबोट लागू नये, कायदा सुव्यवस्था व शांतता राखावी यासाठी पोलिस यंत्रणेचे मोठे प्रयत्न सुरु असतात. गुरांची वाहतूक, मोकाट गुरांची पळवापळवी, जनावरांची कत्तल असे कितीतरी अपकृत्य या काळात होत असतात. यावरुन दोन गटांत वादावादी होऊन त्याचे पर्यवसान सामाजिक तेढ वाढण्यात होते. इतर अपप्रवृत्ती यामुळे वाढून या प्रकरणाला राजकीयदृष्ट्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रंगही चढतो. इतरांना निमित्त मिळते. 2012 मध्ये शृंगारतळीत ईद सणात अशाप्रकारे दोन गटात जातीय तेढ निर्माण होईल, अशाप्रकारची घटना घडली होती. अशा घटनांना कुठेही खतपाणी मिळू नये यासाठी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पोलीस निरीक्षक बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक
झाली. या बैठकीत बोडके यांनी मार्गदर्शन केले. गुरांची वाहतूक करु नये, मोकाट गुरांना आवर घालणे, त्यांच्या मालकांना पोलिस पाटील यांच्याकडून समज देऊन गुरे दावणीखाली आणणे. जे गुरेमालक आहेत त्यांच्या नावाची यादी आमच्याकडे पाठविणे, अशा सूचना करण्यात आल्या. ईद सण शांततेत व आनंदाने साजरा करावा, सर्वधर्मियांची ही जबाबदारी असून त्यांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बोडके यांनी केले.
या बैठकीला पाटपन्हाळे सरपंच संजय पवार, सुधाकर चव्हाण, श्याम शिर्के, सत्यप्रकाश चव्हाण, जावेद केळकर, दिनेश चव्हाण, हुसेन बोट, गौरव वेल्हाळ, महेश कोळवणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.