खेड ; उद्योजक सतीश वाघ यांच्या पुढाकाराने लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना सशुल्क लसीकरण मोहीम सुरू

0
42
बातम्या शेअर करा

खेड – कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन व लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्या पुढाकाराने व औद्योगिक वसाहतींमधील १७ कंपन्यांच्या सहकार्याने कामगारांसाठी ४ हजार लसी उपलब्ध करण्यात आल्या असून सशुल्क लसीकरण मोहीम सुरू झाले आहे. या उपक्रमाबद्दल कामगार वर्ग व लोटे पंचक्रोशी मधून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे सतीश वाघ यांनी कोरोना परिस्थितीत केलेले काम सर्वश्रुतच आहे. गेल्या महिनाभरापूर्वी त्यांच्या भरीव योगदानातून हॉटेल वक्रतुंड येथे परमेश्वर गौड यांच्या माध्यमातून कोविल केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. एकंदरीत त्याने आपला दानशूरपणा वेळोवेळी दाखवून दिला आहे. गेल्या सव्वा वर्षापासून अजूनही कोरोनाचे सावट आहे. कोरोना कधी संपेल ? याची कोणतीही शाश्वती नाही. गेल्या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योग ठप्प झाले होते. तर आता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये मोठा केमिकल झोन आहे. या औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार काम करीत आहेत. कामगार वर्ग या वसाहतीमधील कंपन्यांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहेत या लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना कोरोनाची बाधा अथवा याचा प्रसार लोटे पंचक्रोशीत होऊ नये, ही बाब लक्षात घेऊन सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे मालक सतीश वाघ यांनी कामगार वर्गासाठी लसीकरण मोहीम राबवता येईल का ? याचा विचार केला आणि ही आपली संकल्पना मुंबई येथील लाईफलाईन हॉस्पिटलचे अनिरुद्ध आंबेकर यांच्याशी आपली इच्छा व्यक्त केली. श्री. वाघ यांच्या प्रतिक्रियेला श्री. आंबेकर यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि १७ कंपन्यांच्या सहकार्याने सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे सतीश वाघ यांनी लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्गासाठी लाईफ लाईन हॉस्पिटल च्या माध्यमातून ४ हजार लसी उपलब्ध केले आहेत.

यानंतर उद्योजक प्रशांत पटवर्धन यांच्या सहकार्याने लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योग भवन मध्ये लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याकरिता लाईफ लाईन हॉस्पिटलचे कर्मचारी नोंदणीचे काम करीत आहेत. तर एस. एम. एस. हॉस्पिटलचे डॉ. परमेश्वर गौड यांचा स्टाफ इथे लसीकरणाची जबाबदारी पार पाडत आहे. शुक्रवारी सुमारे १ हजार कामगारांना लस देण्यात आली. मात्र वाघ यांनी १ हजार २०० कामगारांना लसीचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु वीज पुरवठा खंडित झाल्याने सदरील उद्दिष्ट साध्य झाले नाही. यामुळे खेड येथील मंगेश बुटाला यांच्याकडून जनरेटर उपलब्ध करण्यात आला आणि या जनरेटरला बॅकअप देण्यात आला असून वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचा वापर करून निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. शनिवारी दुपारपर्यंत १ हजार कामगारांना लस दिली गेल्याची माहिती उद्योजक सतीश वाघ यांनी दिली. एकंदरीत लोटे औद्योगिक वसाहतीमधील ४ हजार कामगारांना लस दिली जाणार आहे. यानंतरचा दुसरा डोस शासनाच्या निर्देशानुसार दिला जाईल, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या उपक्रमाबद्दल कामगारांसह लोटे पंचक्रोशी मधून समाधान व्यक्त केले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here