रत्नागिरी:- वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ २४ तास रुग्णवाहिका व चालक उपलब्ध करा अशी मागणी गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे लेखी निवेनाद्वारे केली आहे. वांद्री आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आहे पण चालकच उपलब्ध नाही.त्यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातावेळी जखमी प्रवाशांना वेळेत उपचार मिळत नाहीत त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात.असे या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर एखाद्या अपघातावेळी रुग्णवाहिका किंवा चालकच उपलब्ध नसेल तर त्या आरोग्य केंद्राचा उपयोग काय? असा सवाल मुझम्मील काझी यांनी उपस्थित केला आहे. दिनांक 8 एप्रिल रोजी वांद्री येथे भीषण अपघात घडला. यावेळी उक्शी ग्रामस्थांनी वांद्री आरोग्य केंद्र येथे संपर्क केला असता रुग्णवाहिका आहे पण चालक नाही असे स्पष्ट सांगण्यात आले. जखमी प्रवाशाला गाडीबाहेर काढून जवळपास अर्धा तास रुग्णवाहिकेची वाट बघत रस्त्यावर ठेवण्यात आले होते,रुग्णवाहिका न मिळाल्याने त्या जखमी प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. अशी वेळ परत येऊ नये म्हणून आमच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत रुग्णवाहिका व चालक 24 तास उपलब्ध करावा असे ही या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाची एक प्रत जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही देण्यात आली आहे.