चिपळूण -चिपळूण शहरातील उक्ताड कानसेवाडी येथे ५८/२ अंतर्गत ठेकेदाराने शौचालयाचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण केले आहे. मात्र, ठेकेदाराला अद्याप बिल अदा करण्यात आलेले नाही. बिल मिळावे, यासाठी ठेकेदार नगर परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ठेकेदारासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. नाईलाजास्तव ठेकेदाराने या शौचालयाला कुलूपच ठोकले आहे. आता तरी नगर परिषदेला जाग येईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चिपळूण नगर परिषद प्रशासनाने ५ मे रोजी २०२० रोजी उक्ताड कानसेवाडी येथे शौचालय बांधकामासाठी विकास कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला अध्यादेश दिले. याकरिता सुमारे १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. नगर परिषदेने अध्यादेश दिल्याने ठेकेदाराने काम पूर्ण केले. मात्र, काम पूर्ण होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी नगर परिषदेने ठेकेदाराला बिल अद्याप अदा केलेले नाही. यामुळे ठेकेदार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. यामुळे बिल मिळावे यासाठी नगर परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. अखेर नाईलाजास्तव ठेकेदाराने या शौचालयाला कुलूपच ठोकलेले आहे आता तरी नगरपरिषद प्रशासनाला जाग येईल का ? असा सवाल उपस्थित होत असून नगरपरिषदेने या ठेकेदाराला बिल अदा करावे, अशी मागणी होत आहे.