गुहागर- गुहागर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशी तळवली ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीत शिवसेना विरूध्द भाजप पुरस्कृत गावपॅनल अशी लढत होत असल्याने या ठिकाणी नक्की कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
अंजनवेल जिल्हा परिषद गटातील महत्वपूर्ण अशी तळवली ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान पंचायत समिती सभापती विभावरी मुळे व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व भास्कररावांचे सर्वात जवळचे सहकारी विनायक मुळे यांचे गाव. त्यामुळे या गावातील निवडणुकीकडे सर्वच राजकीय पदाधिका-यांचे लक्ष लागून राहिले आहे. ही ग्रामपंचायत एकूण ९ सदस्यांची असून या ठिकाणी दोन सदस्य हे बिनविरोध निवडणूक आले आहेत तर याठिकाणी सात सदस्यांसाठी मतदान होणार आहे. त्यातच मुळे पती- पत्नी यांचे शिवसेना पुरस्कृत पॅनल विरुध्द भाजपचे कट्टर समर्थक गुरू कारेकर यांचे गाव पॅनेल यांच्यात ही लढत होत असल्याने याठिकाणी नक्की कोण बाजी मारणार ? याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. मुळे कुटुंबियांचे गुहागर तालुक्यातील राजकीय वजन कमी करण्यासाठीच याठिकाणी निवडणुक होत असल्याची चर्चा संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे. मात्र असे असले तरी गेली पंधरा वर्ष ज्यांनी आपल्या कारकिर्दीने राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. त्या मुळे दांपत्यांना पराभूत करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील भाजप कार्यकर्ते गाव पॅनलच्या प्रचारासाठी आघाडी घेताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे याठिकाणी होणारी निवडणूक ही रंगतदार होणार असून नक्की कोण बाजी मारणार याच्या पैजा सध्या तळवली पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यात लागल्या आहेत.