गुहागर – (लक्ष्मीकांत घोणसेपाटील)- : गुहागर तालुक्यातील राजकीय फड दिवसेंदिवस रंगू लागला आहे.त्यामुळे सर्वात महत्त्वपूर्ण व उत्कंठावर्धक लढत होणार ती तवसाळ या ग्रामपंचायतीत या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आप-आपले वर्चस्व पणाला लावले असल्याने ही लढत लक्षवेधी होणार हे मात्र तेवढेच खरं. मात्र अस असल तरी या ग्रामपंचायतीवर कोण वर्चस्व गाजवणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
गुहागर तालुक्यात २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये तवसाळ ग्रामपंचायतीत सुध्दा निवडणूक जाहीर झाली. या ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य आहेत. तर ही ग्रामपंचायत दोन गावांमध्ये विभागली गेली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, शिवसेना जि. प. चे उपसभापती महेश नाटेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते यांचे मूळगाव आहे. त्यामुळे या ठिकाणी तिघांचेही वर्चस्व पणाला लागले आहे. यातच या ग्रामपंचायतीमधून एक सीट ही बिनविरोध झाली आहे. तर उरलेल्या आठ सदस्यांमध्ये कडवी लढत होणार हे मात्र नक्की. आपण तालुक्यातील राजकारणात वरिष्ठ पदावर असल्याने गावातही आपले तेवढंच वजन आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी करणार असल्याने या गावातील लढत ही अतिशय अटीतटीची होईल असे येथील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. तर काहीही झालं तरी गावात सत्ता आमचीच येईल असे या तीनही राजकीय नेत्यांकडून बोलले जात असल्याने या ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.