मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात बर्निंग कारचा थरार; सुदैवाने प्रवाशी बचावले

0
261
बातम्या शेअर करा

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात आज सकाळी बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. कारमधून प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हे सारे प्रवाशी बालंबाल बचावले.

आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घाट चढणाऱ्या मारूती बलेनो कारने पेट घेतला. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. मंडणगड तालुका आरोग्य विभागात काम करणारे काही कर्मचारी मारुती बलेनो कारने रत्नागिरी येथे जायला निघाले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही कार भोस्ते घाट चढत असताना अचानक कारच्या इंजिनमधून धुर येऊ लागला. चालकाच्या लक्षात येताच त्याने कार थांबवून कारमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांसह अन्य प्रवाशांना कार बाहेर काढले. कारमधून प्रवास करणारे सारे प्रवासी बाहेर पडताच कारने अचानक पेट घेतला आणि बघता बघता कारचा अक्षरश: कोळसा झाला. कारमधून प्रवास करणारे प्रवासी प्रसंगावधान राखून बाहेर पडले नसते तर काय झाले असते याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात.
कार चालकाने या दुर्घटनेचे माहिती खेड पोलिसांना देताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान खेड नगरपालिकेचा अग्नीशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांती आगीवर नियंत्रण मिळवले आणि महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here