शृंगारतळी; खासगी गाळेमालकांची स्वच्छतागृह उभारणीबाबत अनास्था ; एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह बाजारपेठेपासून दूर, ग्राहकांसह व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय

0
189
बातम्या शेअर करा


गुहागर– गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत स्वच्छतागृहांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. येथे एकमेव असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह हे बाजारपेठेपासून दूर वेळंबफाट्यावर ग्रामपंचायतीने बांधले आहे. विशेष म्हणजे ज्या मालकांनी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी व्यवसायिक गाळे बांधले आहेत त्यातील काहींनी स्वच्छतागृहेच बांधली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाडेकरु व्यापारी, त्यांचे कामगार यांचीही मोठी गैरसोय झालेली असल्याचे पहायला मिळत आहे.
पाटपन्हाळे गावच्या कार्यक्षेत्रात असलेली शृंगारतळी 20 ते 25 गावांची मोठी बाजारपेठ आहे. नेहमीच येथे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी असते. शृंगारतळीत ग्रामपंचायतीचे एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह आहे ते पण बस थांबा व बाजारपेठेपासून दूर आहे. ज्या ठिकाणी याची आवश्यकता आहे तेथेच स्वच्छतागृह नाही. पालपेणे फाटा, मुख्य बाजारपेठ दरम्यान, एकही स्वच्छतागृह नाही. पालपेणे फाटा येथे दर शनिवारचा आठवडा बाजार भरतो. शिवाय बस थांब्यावर शाळेची मुले, बाहेरुन खरेदीसाठी येणारे ग्राहक, रिक्षा चालक, व्यापारी यांना स्वच्छतागृह अशा मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे मोठी कुचंबणा होते. जे खासगी व्यावसायिक गाळेमालक आहेत व त्यांच्या गाळ्यांमध्ये भाड्याने व्यवसाय करणारे दुकानदार, कामगार आहेत यांच्यासाठीही त्यांच्या गाळे मालकांनी स्वच्छतागृहांची सोय केलेली नाही. वास्तविक जागेअभावी सार्वजनिक स्वच्छतागृहे नसली तरी गाळे मालकांनी आपल्या भाडेकरु व त्यांच्या कामगारांसाठी अशी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. केवळ स्थानिक प्रशासनाला दोष न देता आपणही याची सुविधा उपलब्ध करुन देणे त्यांचे कर्तव्य असल्याचे बोलले जात आहे.
पाटपन्हाळे गावाने स्वच्छतेकडून समृध्दीकडे असा वसा घेतलेला आहे. स्वच्छतेबाबत या गावाने मोठी कामगिरी बजावली आहे. मात्र, स्वच्छतागृहांच्या अभावी अधिक अस्वच्छता येथे निर्माण झालेली आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला कोवीड योध्दा म्हणून जिल्ह्यात व्दितीय क्रमांक मिळालेला आहे. तालुकास्तरावरही प्रथम क्रमांक मिळालेला आहे. गावात विकासाची कामेही प्रगतीपथावर आहेत. तरुण, तडफदार सरपंचही या गावाला मिळालेला आहे. एकिकडे गावाचा असा गौरव होत असताना दुसरीकडे मात्र, स्वच्छतागृहांची वानवा असल्याचे पहायला मिळत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here