चिपळूण – (विशेष प्रतिनिधी )-कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मेंगलोरच्या दिशेने जाणारी ‘नेत्रावती’ सुपर फास्ट एक्स्प्रेसचे इंजिन कोकण रेल्वे मार्गावरील नातूनगर बोगद्याजवळ आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अचानक बंद पडल्याने कोकण मार्गावरील तब्बल १ तास ५० मिनिटे वाहतुकीचा खोळंबा झाला.
लोकमान्य टिळकस्थानका वरून सुटलेली नेत्रावती एक्स्प्रेस हि निर्धारित वेळेत धावत होती. मात्र हि गाडी नातुनगर बोगद्याजवळ आली असता गाडीचे इंजिन मध्ये अचानक बिघाड झाल्याने चालकाने हि गाडी थांबवली. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिल्या नंतर खेड स्थानकाकडून नवीन इंजिन नातुनगर येथे पाठवण्यात आले. ते इंजिन जोडल्यानंतर सांयकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास नेत्रावती एक्स्प्रेस मेंगलोरच्या दिशेने रवाना करण्यात आली. इंजिन बंद पडलेल्या नातूनगर या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहचून प्रवाशांना मदत केल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.