गुहागर -गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाकरिता गुहागर व चिपळूण तालुक्यामधील संपादित जमिनीचा मोबदला तातडीने न मिळाल्यास २६ जानेवारी २०२१ रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष विनय नातू यांनी प्रशासनाला दिला आहे. चिपळूण प्रांताधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात नातू यांनी नमूद केले आहे.
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झालेले आहे. शेतकरी व जमीनमालकांनी रस्ते विकासकारिता जमीन दिली आहे. संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे व रस्त्याच्या कामाला सुरुवातही झालेली आहे. जमीन व जमिनीवरील झाडे तसेच इमारती यांचा मोबदला जमीनदारांना मिळणे गरजेचे आहे. जमीन मोबदल्यात विविध अधिकारी व कार्यालये यांचेकडे संपर्क केला असतं कोणतेही कार्यालय उत्तर न देता काम दुसऱ्यावर ढकलते. शासनाच्या नियमानुसार जो देय मोबदला आहे हा तातडीने मिळणे गरजेचे आहे. तसेच ज्या भागांमधील संयुक्त मोजणी राहिली असेल तर ती संयुक्त मोजणी तातडीने होणे गरजेचे आहे व जमीनमालक, शेतकरी यांना नियमांनुसार मिळणारा जमीन, झाडे, इमारतीचा मोबदला देण्यात यावा. १ मे २०२० रोजी या विषयाकरिता आंदोलन करण्यात येणार होते. परंतु कोरोनामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन करु नये, असे कळविल्यामुळे आंदोलन स्थगित केले होते. भूमी अभिलेख विभागाकडील तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडील अपूर्ण काम अजून महिन्यांनंतरही पूर्ण होणार नसेल तर आंदोलन हाच पर्याय आमच्यासमोर आहे, असे स्पष्ट करतानाच त्यांनी पुढे नमूद केले आहे की, १५ जानेवारी २०२१ पूर्वी गुहागर ते चिपळूणमधील भूसंपादन प्रक्रियेची पूर्तता करुन सर्व शेतकरी व जमिनदारांना मोबदला त्वरित देण्यात यावा, हा मोबदला १५ जानेवारी २०२१पर्यंत न मिळाल्यास २६ जानेवारी २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी विपण यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन ग्रामस्थांसह स्वत: करणार आहे, असा इशारा विनय नातू यांनी दिला आहे.