शुंगारतळी – (तेजस आंबेकर )- गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेतील आठवडा बाजार दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार यांनी दिली.पालपेणे फाट्यावर नव्या जागेत हा बाजार भरणार असून विविध अटी-शर्थीचे पालन करूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात ते आठ महिने बंद असणारा येथील आठवडा बाजार पुन्हा एकदा तालुक्यातील नागरिकांसाठी खुला होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शृंगारतळी बाजारपेठेत सापडल्यानंतर येथील आठवडा बाजार बंद करण्यात आला होता. कोरोनाचा तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील आठवडा बाजार काही महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र सध्या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा आठवडा बाजार नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.या वेळी प्रत्येक व्यापाऱ्यांचे आधारकार्ड घेतले जाणार असल्याची माहितीदेखील सरपंच संजय पवार यांनी दिली.तसेच नव्या जागेत सुरू होणाऱ्या या बाजारात म्हणजेच पालपेणे रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवणार असल्याची माहिती श्री पवार यांनी यावेळी दिली.