चिपळूण – (मंगेश तावडे)- कोकणातील अनेकांना गंडा घालणाऱ्या व वादग्रस्त ठरलेल्या कलकाम मायनींग अँड लॉजिस्टिक कंपनीचा आणखी एक घोटाळा समोर आला असून ठेवीदारांना कोणताही लाभ न देता परस्पर ३१ लाख ३९ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या चार संचालकांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वेळणेश्वर येथील संतोष दत्तात्रय भाटकर वेळणेश्वर यांनी फिर्याद दिली आहे.
चिपळूण शहरातील स्वामी कॉम्प्लेक्स येथे कलकाम मायनींग अँड लॉजीस्टिक प्रा.लि.या कंपनीचे कार्यालय होते. ठेवीदारांना अनेक वेगवेगळी आमिषे दाखवून या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले गेले होते. या अमिषापोटी अनेकांनी येथे गुंतवणूक केली होती.त्यासाठी काही एजंटही नियुक्त होते.मात्र मुदत संपल्यानंतर तसेच कंपनीच्या करारानुसार ठेवीदारांना कोणताही लाभ मिळाला नाही.अशी तक्रार यापूर्वीही झाली होती. आता संतोष भाटकर यांनी फिर्याद दिल्यानुसार तब्बल ३१ लाखापेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे.या तक्रारीनुसार कलकाम कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विष्णू पांडुरंग दळवी (४७,रा.ठाणे),डेव्हलपमें ट डायरेक्टर सुनील रघुनाथ वांद्रे(३९, रा.नालासोपारा), यशवंत व्हिवा (टाऊनशीप वसई),आणि विजय चंद्रकांत सुपेकर (४६नालासोपारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील करीत आहेत.