चिपळूण ; अजब कारभाराची चर्चा ,रामपूर-मार्गताम्हाने भागातील ग्रामसेवकांच्या बदल्या सोयीनुसार

0
347
बातम्या शेअर करा

रामपूर – चिपळूण तालुक्यातील रामपूर-मार्गताम्हाने विभागातील काही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांच्या बदल्या सोयीनुसार होत असल्याचे समोर येत आहे. काही ग्रामसेवकांची 5 वर्षांची मुदत संपूनही तोच ग्रामसेवक आमच्या ग्रामपंचायतीला हवा असा हट्टाहास तेथील स्थानिक पुढारी करीत आहेत. याउलट काही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक 1-1 वर्षांने बदलत असून अशा ग्रामपंचायतींवर अन्याय होत असून अशा पध्दतीने होणाऱ्या ग्रामसेवक बदल्यांची साखळी चिपळूण पंचायत समिती प्रशासन तोडून ग्रामपंचायतींना न्याय द्यावा, अशी मागणी जागृक नागरिकांनी केली आहे.

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने बुद्रुक या ग्रामपंचायतीत काही महिने प्रभारी ग्रामसेवक होते. यानंतर काही दिवसांपूर्वीच नवे ग्रामसेवक रुजू झालेले आहेत. नजीकच्या मार्गताम्हाने खुर्द ग्रामपंचायतीची स्थिती तर याउलट झाली आहे. येथे गेल्या 5 वर्षात 4 ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या असून कायमस्वरुपी ग्रामसेवक अद्याप का दिला जात नाही असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्याने मार्गताम्हाने व मार्गताम्हाने खुर्द या दोनही ग्रामपंचायतींच्या विकासकामांवर मोठा परिणाम झालेला आहे. मार्गताम्हाने खुर्द गावाने अशा बदल्यांपुढे हातच टेकले आहेत.येथे आलेला ग्रामसेवक एक वर्षपण काढत नाही. लगेच तो आपल्या आजाराचे किंवा अन्य कारणे देत बदलीसाठी अर्ज करतो. त्याच्या बदलीच्या अर्जाची प्रक्रिया ही तो हजर झाल्यापासून 3 महिन्यातच सुरु होते. त्यामुळे सतत बदल्यांमुळे येथील ग्रामस्थ संतप्त झालेले दिसून येत आहेत.
दुसरीकडे अन्य गावांतील ग्रामसेवकांची 5 वर्षांनी बदली झाली की, तेथील स्थानिक पुढारी आपल्या सोयीचा ग्रामसेवक असल्याने त्याची बदली थांबवतात. त्यासाठी ते सर्वकाही सोपस्कार पार पाडतात. संबंधित ग्रामसेवकांमुळे गावची विकासकामे चांगली होतात, ग्रामस्थांना तो पाहिजे आहे अशी स्तुतीपर कारणे पुढे करुन संबंधित ग्रामसेवकांना तेथेच ठाण मांडण्यास प्रवृत्त करतात. मागणी करणारे असे स्थानिक पुढारी हे गावात कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने स्वयंभू व एकमेव असतात. त्यांना मनासारखे कामाचे ठेके पाहिजे असतात व त्यावर मान डोलवणारे ग्रामसेवक पाहिजे असतात, हेच मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. मुळात प्रत्येक ग्रामपंचायतीत येणारा ग्रामसेवक हा विकासकामे करण्यासाठीच आलेला असतो. तो तेथील परिस्थितीशी जुळवूनही घेत असतो. अशा ग्रामसेवकाला तेथील राजकारणाशी काहीही संबंध नसतो. ते प्रामाणिकपणे येथील ग्रामस्थांच्या मदतीने कामे करण्यास सज्ज असतात. अशावेळी ग्रामसेवकांची मुदत संपूनही त्यांची पुन्हा मागणी करुन तेथेच त्यांना कार्यरत ठेवणे व नवीन येणारा ग्रामसेवक धुडकावून त्याला एकप्रकारे कमी लेखण्याचा प्रकार काही गावांमध्ये सुरु असून अशा ग्रामसेवकांवर अन्याय करण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.
नव्या गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
चिपळूण पंचायत समितीला काही दिवसांपूर्वी प्रशांत राऊत हे नवे गटविकास अधिकारी मिळाले आहेत.यापूर्वी त्यांनी दापोली तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. त्यांनी चिपळूण तालुक्यातील काही भागांमध्ये अशा पध्दतीने होणाऱ्या ग्रामसेवक बदल्यांची ही साखळी तोडून ग्रामपंचायतींना न्याय द्यावा, अशी मागणी रामपूर-मार्गताम्हाने भागातील सूत्र नागरिकांनी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here