चिपळूण -दिव्यांगाना साहित्य खरेदीचा अधिकार असताना लाभार्थ्यांना साहित्य सभापती धनश्री शिंदे यांनी दिले, तशी कबुली पंचायत समितीच्या सभेत सभापतींनी दिली आहे. तसेच हा विषय इतिवृत्तावरून समोर आला आहे. हे सर्व पाहता दिव्यांगांना साहित्य खरेदीचे अधिकार असताना सभापतींना हा अधिकार कोणी दिले ? असा सवाल भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी उपस्थित करीत या प्रकरणाची फेरचौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
गेली काही महिने दिव्यांगांसाठी साहित्य खरेदीचा विषय गाजत आहे. विशेष म्हणजे हा विषय पंचायत समितीच्या मासिक सभेत सेनेचे गटनेते राकेश शिंदे, सदस्या अनुजा चव्हाण यांनी उपस्थित करून खळबळ उडवून दिली होती. यामुळे हा विषय ऐरणीवर आला होता. नंतर या विषयात आ. भास्कर जाधव, माजी आमदार व भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, यांच्यासह तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांनी उडी घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानुसार काही दिवसांपूर्वी या प्रकरणाची चौकशी झाली. मात्र, यानंतर तक्रारदार रश्मी माने यांनी आता काही मुद्दे उपस्थित करीत फेरचौकशीची मागणी केली आहे. यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तर आता या प्रकरणी भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांनी हा विषय उचलून धरत दिव्यांगांना साहित्य खरेदीचा अधिकार असताना तसे शासकीय निर्देश असताना सभापती धनश्री शिंदे यांनी दिव्यांगासाठीच्या साहित्यांची खरेदी करून लाभार्थ्यांना कसे काय दिले ? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. कारण सभापतींनीच आपण दिव्यांगांसाठीचे साहित्य खरेदी करून लाभार्थ्यांना दिले आहे. तशी कबुली पंचायत समितीच्या मासिक सभागृहात दिली आहे. यावरून दिव्यांगांच्या खात्यात अनुदान जमा झाले असले तरी साहित्य दिव्यांगाना खरेदी करता आले नाही, असे समोर येत आहे. एकंदरीत या प्रकरणात काहीतरी गोलमाल असल्याचे चर्चा आहे. यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याबरोबरच आपण हा विषय विधानसभा विरोधी गटनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद गटनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे देणार असल्याचे सांगितले. नियमाला डावलून दिव्यांगाना साहित्य दिल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करणार आहोत, असे शेवटी सांगितले.