गुहागर – गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील बँक मॅनेजर सुनेत्रा दुर्गुळे यांच्या हत्येचा शोध लावण्यात गुहागर पोलिसांना यश आले असून अवघ्या 12 तासांत पोलीसांनी संजय फुणगुसकर व सत्यजित पटेकर अशा दोन आरोपींना अटक केली आहे.
वेलदुर येथील बँकेच्या महिला शाखाधिकाऱ्यांच्या खुनाने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत या दोन आरोपींना अटक करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
संजय फुणगुसकर यांनी सत्यजित पटेकर याला सोबत घेवून पैशांसाठी सुनेत्राचा खून केल्याचे सांगितले. संजय फुणगुसकर हा विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरमध्ये सराफाचे काम करत होता. सुनेत्रा यांनी सोन्याच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये आणलेले होते. सदर पैशांच्या हव्यासापोटी संजय फुणगुसकर आणि सत्यजित पटेकर यांनी सुनेत्रा दुर्गुळे यांचा गळा आवळून खुन केला. त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मयताला वेलदूर नवानगर तरी जेट्टी येथे आणून मयताच्या पायाला व कमरेला रस्सी बांधून रस्सीला दोन मोठे दगड बांधून जेट्टीसमोर दाभोळ खाडीत ढकलून देण्यात आले. असे या दोन आरोपींनी तपासात सांगितले.
अवघ्या 12 तासांच्या आत पोलीसांनी या आरोपींना शोधले. या तपासामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका होती. तपास पथकात पोलीस उपनिरिक्षक किरणकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील, सचिन चव्हाण, संतोष साळसकर, संतोष माने, वैभव चौगुल, हेमलता कदम, आदीनाथ आदवडे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, राकेश बागुल, अरुण चाळके, गुरु महाडिक, रमीझ शेख, पोलीस उपविभागीय कार्यालयातील मिलिंद चव्हाण, इम्रान शेख, मनोज कुळे यांचा समावेश आहे.