गुहागर – गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासात मुंबईला जाताना खासगी ट्रॅव्हल्स कडून प्रत्येकी १८०० रूपयांपर्यंत तिकीट दर आकारून खुलेआम लूट सुरूच आहे. याकडे प्रशासनाने मात्र डोळेझाक केली आहे. आता या ट्रॅव्हल्स मधून परमिट व प्रत्येक प्रवाशाचा विमा काढला जातो का, याची तपासणी प्रशासनाने करण्याची मागणी होत आहे.
गुहागर तालुक्यात मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांपैकी ७५ टक्के चाकरमानी आपली नोकरी व व्यवसाय टिकवण्यासाठी परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र कोरोनाच्या संकटातूनही माणूस माणसाला लुटण्याचा धंदा करत आहे. सुरुवातीला मुंबई येथून येण्यासाठी एस. टी.च्या बसेस नव्हत्या पास काढून यावे लागत होते. कोणतीही वाहतूक व्यवस्था नसताना खासगी ट्रॅव्हल्स मात्र मोठ्या प्रमाणात तालुक्यात येत होत्या. त्यावेळी पास काढण्यासह तिकिटामागे हजारो रुपये घेतले गेले. त्यावेळीही चाकमान्यांसाठी अडचणीचे होते. आता एस. टी. ग्रुप बुकिंग मिळेल तेव्हा मिळेल, परंतु नोकरी व व्यवसाय वाचला पाहिजे यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार चाकरमानी घेत आहेत. सुरुवातीला खासगी ट्रॅव्हल्स मधून येणाऱ्या चाकरमान्यांना पास कसा मिळतो व वाहतूक कशी होते याबाबत भाजपने सवाल उपस्थित केला होता. आता पुन्हा प्रवाशांच्या होणाऱ्या लुटीवर भाजपचे तालुका मुंबई संपर्कप्रमुख संतोष जैतापकर यांनी सोशल मिडियावरून चाकरमान्यांची लूट करू नका असे आवाहन केले आहे.
आज परत निघणारे चाकरमानी मजबुरीने जात आहे. कोरोनासारख्या प्रादुर्भावात किती दिवस काम नसताना गावी राहणार असे म्हणत आधीच आर्थिक संकट कोसळलेल्या चाकरमान्यांची मुंबईत परतताना होणाऱ्या लुटीवर जैतापकर यांनी लक्ष केंद्रीत केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काही खासगी ट्रॅव्हल्सने प्रत्येकी १२०० रूपयापर्यंत तिकीट दर आकारला, परंतु ज्यांना गरज असेल ते येतीलच असे म्हणून उर्वरीत तब्बल 6 ट्रॅव्हल्सवाल्यांनी 1800 प्रत्येकी तिकीट दर कायम ठेवला आहे.त्यामुळे होणाऱ्या या लुटीकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.