कोकण म्हणजे निसर्गाने भरभरुन दिलेलं दान असणारी भूमी कोकण भूमी जशी इथल्या जैवविविधतेसाठी प्रसिध्द आहे. तशीच ती येथील सागरी किनाऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे. 720 किलोमीटर लांबीच्या या किनारपट्टीच्या भागात सागरी संपन्नता असून देखील त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोणातून मोठया प्रमाणावर विचार झाला नाही आणि वापर देखील झाला नाही.स्वच्छ आणि भूरळ घालणाऱ्या इथल्या सागरी किनाऱ्यांना पर्यटनाची जोड देण्याची आवश्यकता आहे आणि यातून स्थानिकांना मोठया प्रमाणावर रोजगाराची संधी मिळणे आणि पर्यायाने या भागातील अर्थकारणास गती मिळणे ही मोठी सुसंधी उपलब्ध आहे.
नजिकच्या गोवा राज्याची ओळख आणि संपूर्ण अर्थकारण तेथील पर्यटनावर अवलंबून आहे आणि गोव्यापेक्षा अधिक सुंदर आणि स्वच्छ सागरी किनारे कोकणात आहेत. याला पर्यटकांच्या गरजेनुसार विकसीत करण्याची योजना यावी यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी हाती घेतली आणि केवळ एक वर्षाच्या आत यातून असणारी मोठी संधी कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे. सध्या कोरणामुळे सर्व उद्योग ठप्प असले तरी यानंतरच्या काळात कोकणची ही भूमी देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र म्हणून जगासमोर येईल हे आताच स्पष्ट जाणवत आहे.याचा पहिला टप्पा पर्यटक अनुकूल व्यवस्था निर्माण करण्याचा आहे. यासाठी बिचशॅक ची संकल्पना मांडली गेली आणि याचे कामही सुरु झाले आहे. रत्नागिरी जिल्हयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून गुहागर आणि आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर प्रत्येकी 10 शॅक सुरु करण्यात येणार आहेत. सागर किनाऱ्यावर कायमस्वरुपी बांधकाम करता येत नाही हे लक्षात घेऊन तात्पुरते बांधकाम असणारे असे शॅक (कुटीर) पर्यटकांसाठी उभारण्यात येणार आहेत. या शॅकसाठी 70 टक्क्यांहून अधिक शॅक हे स्थानिकांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे याचा उद्देश स्थानिक युवकांना रोजगार मिळावा हाच आहे.याच स्वरुपाचे शॅक संपूर्ण किनारपट्टीवर सिंधुदूर्ग, रायगड तसचे पालघरच्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी यापुढील काळात उपलब्ध होतील. कोकण पदार्थाची लज्जत येथे पर्यटकांना घेणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे इतरही खाद्य व्यवस्था असेल, पर्यटकांची आवड ही याच्या निर्मितीत महत्वाची ठरणार आहे.
कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणात प्रवास करण्याची सोय आहे. सोबतच पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदूर्ग जिल्हयात ताज च्या सहकार्याने पंचतारांकित हॉटेलची उभारणी येत्या 3 वर्षांमध्ये करण्याचा करारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. याने या जिल्हयातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
सिंधुदूर्गात चिपी येथील विमानतळ लवकरच कार्यान्वीत होणार आहे आणि दुसऱ्या बाजूस सागरी महामार्गाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. हवाई मार्ग, सागर मार्ग तसेच गोवा मुंबई महामार्ग आणि कोकणरेल्वे यांच्या सहाय्याने कोकण आता रिचेबल झालाय आणि आतिथ्यासाठी कोकणी माणूसही सज्ज होवून साद घालत आहे….येवा कोंकण आपलाचअसां..!
प्रशांत दैठणकर जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी
