बातम्या शेअर करा


चिपळूण – केंद्र शासनाने कोरोनाच्या संकटातही JEE- NEET परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी केंद्र शासनाच्या या निर्णयाला काँग्रेस कडाडून विरोध करीत असून या परीक्षांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनासाठी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

देश कोरोना विरोधातील लढाई लढत असताना केंद्रशासनाने JEE-NEET परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या काळात या परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. कारण कोरोना संसर्गाची विद्यार्थी आणि पालकांना भीती आहे. हीच बाब लक्षात घेऊन काँग्रेसने केंद्र शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण काँग्रेसने केंद्र शासनासाठी येथील प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. यानंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर या निर्णयाचा फलकांद्वारे विरोध करण्यात आला. यावेळी जेईई- नीटच्या परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता महत्वाची, अशा आशयाचे फलक हाती घेण्यात आले होते. यावेळी प्रशांत यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत केंद्र शासनाने जेईई- नीटच्या परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. एकंदरीत या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या परीक्षा स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी चिपळूण काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी दिली. यावेळी काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेविका सफा गोठे, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अनवर जबले, माजी नगरसेवक रतन पवार, रमेश खळे, जिल्हा सरचिटणीस रफिक मोडक, गुलजार कुरवले, काँग्रेस सेवादल चिपळूण तालुकाध्यक्ष अशफाक तांबे, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले, अल्ताफ दळवी, अक्रम खान, दाऊद जबले, नंदकुमार कामत आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here