गुहागर – गुहागर तालुक्यातील गुहागर – चिपळूण मार्गावरील देवघर येथील तब्बल १३ वर्षांपासून रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच कोटी रुपये देण्याचे आश्वासन विपुल कदम यांना दिले आहे.
देवघर येथील क्रीडा संकुलचे काम हे गेल्या 13 वर्षापासून निधी अभावी रखडले आहे. क्रीडा संकुल लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक राजकीय नेते प्रयत्न करत आहेत. हाच मुख्य मुद्दा घेऊन शिवसेनेचे नेते विपुल कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी उदय सामंत यांनी तीन कोटी रुपयांच्या निधी ऐवजी पाच कोटी रुपयांचा निधी आपण या संकुलासाठी देऊ असे आश्वासन यावेळी दिले. त्यामुळे लवकरच हे क्रीडा संकुल पूर्णत्वास जाईल आणि क्रीडा प्रेमींना एक चांगले क्रीडा संकुल मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या क्रीडा संकुलाअभावी आपल्या तालुक्यातील खेळाडू आणि तरुणांची मोठी गैरसोय होत होती, ही बाब विपुल कदम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी तात्काळ क्रीडा संकुलासाठी नियोजित असलेल्या ३ कोटी रुपयांच्या निधीत वाढ करून एकूण ५ कोटी रुपयांचा भरीव निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.या वाढीव निधीमुळे आता क्रीडा संकुलाचे काम वेगाने पूर्ण होईल आणि लवकरच ते आपल्या सर्वांसाठी खुले होईल. असे विपुल कदम यांनी सांगितले.