चिपळूण – चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा इशारा जारी करण्यात आला आहे. वशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठलेली असतानाच, आता कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरात दाखल होणार असल्याने पाण्याची पातळी आणखी वाढणार आहे. प्रशासनाने पुढील ८ तास अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
कोळकेवाडी धरण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे (आज सकाळी ८ ते १२:३० पर्यंत ८९ मिमी) धरणाची पाणी पातळी १३४.९० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी १ वाजता धरणाची एक मशीन सुरू करणे अनिवार्य झाले आहे. यातून सोडलेले पाणी दुपारी २ वाजेपर्यंत शहरात पोहोचेल, ज्यामुळे नदीच्या पातळीत मोठी वाढ अपेक्षित आहे.
सध्या वशिष्ठी नदीची पातळी ५.९० मीटर असून ती इशारा पातळीवर आहे. शहरातील बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका, वडनाका, पेठमाफ यांसारख्या सखल भागांमध्ये आधीच एक ते दीड फूट पाणी साचले आहे. या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका, महसूल, पोलीस आणि NDRF यांची ११ पथके शहरात तैनात करण्यात आली असून, ५ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दसपटी भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे धोका कायम आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.