खेड – कोकणातील सर्वात महत्वपूर्ण असा गणेशोत्सव २२ ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी आतापासूनच धाव घेतल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईहून कोकणात येण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चाकरमान्यांच्या गाड्यांची रांग लागलेली असून यामुळे वाहतूक काही काळ ठप्प आहे. हि रंग सुमारे दोन ते तीन किलोमीटर इतकी आहे. या रांगेतच अवजड वाहने असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चाकरमानी ७ तारखेपर्यंत कोकणात आले तरच २२ तारखेला क्वारंटाईन होऊन बाहेर पडू शकतात, या गणितामुळे आतापासूनच चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. या काळात वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी देखील होत आहे.