रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावर निवळी घाटात सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात होऊन टँकरमधील सीएनजीची गळती झाल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली. गळती झालेला सीएनजी हवेत पसरला आणि त्यात लागलेली आग एका घरापर्यंत पोहोचली. या दुर्घटनेत आगीमुळे एक म्हैस भाजली असून, घराजवळची रिक्षा आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्स बस मधील प्रवाशांना दुखापत झाली असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातग्रस्त टँकर मुंबईच्या दिशेने जात होता तर खासगी बस चिपळूणहून रत्नागिरीला येत होती. बावनदी येथे टँकरची खासगी बसला धडक बसली. ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्ता सोडून वीस फूट खाली गेली. ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे सर्वच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे टँकरची सीएनजी भरलेली टाकी रस्त्याच्या कडेला गटारानजीक पडली आणि त्यातून सीएनजीची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्समधून 25 पेक्षा जास्त शिक्षक प्रवास करत होते. ते रत्नागिरीत एका प्रशिक्षणासाठी येत होते. या अपघातात ते सर्वजण जखमी झाले आहेत.