गुहागर – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला या वर्गात शिक्षण घेत असलेले शुभम मांडवकर याने राज्यस्तरीय ऑनलाइन पेंटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर साहिल आग्रे याने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
रीजनल टीचर्स ऑर्गनायझेशन मार्फत महाराष्ट्र राज्यस्तरीय ऑनलाइन पेंटीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रुप चौथा यंग आर्टिस्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी होता. यामध्ये शुभम मांडवकर (द्वितीय वर्ष कला) याने प्रथम क्रमांक पटकावला.
तर हुंडा विरोधी चळवळ, मुंबई यांच्यावतीने “शिक्षणाचा वाढता प्रसार असूनही हुंड्यासारख्या समाजविघातक रूढीचे आजपर्यंत निर्मूलन का झाले नाही?” या विषयावर मराठी भाषेतील महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत साहिल आग्रे (द्वितीय वर्ष कला) याने द्वितीय क्रमांक पटकाविला तर कु. नेत्रा पाध्ये (प्रथम वर्ष वाणिज्य) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थानकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.