गुहागर – तुम्ही कोणीही डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालायचा नाही, नाहीतर सगळ्यांना जेलमध्ये टाकेन अशी धमकी गुहागर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सचिन सावंत यांनी गुहागर तालुक्यातील अडूर येथील बुद्ध बांधवाना दिली आहे. सावंत हे बौध्द धर्मद्वेष्टे असुन ते त्यांच्या वागणुकीतून आमच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. त्यांची आठ दिवसाच्या आत बदली न झाल्यास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी गुहागर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अडूर बौध्दजन सहकारी संघाने जिल्हाधिकऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अडुर गेले अनेक वर्षापासून बौद्ध समाजात सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यावरून दोन गटात वाद सुरू होते तसेच यासंदर्भात दोन्ही पार्टीकडून सदर ठिकाणी कार्यक्रम करण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याबाबत एकमेकांचे विरोधात लेखी अर्ज आमच्याकडे आले होते. त्यामुळे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. त्यामुळे सदर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही त्या अनुषंगाने यापूर्वी आम्ही स्वतः बीट अंमलदार यांनी वेळोवेळी पोलीस ठाणे स्तरावर बैठका घेऊन सदर वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला दोन्ही गटातील वाद सामंजसपणाने मिटून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. असे गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी सांगितले.
गुहागर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दिवशी काही ठराविक हितशत्रुंच्या दबावाला बळी पडुन पोलिस फौजफाटा सोबत आणुन आम्हाला सुमारे दिडशे लोकांना धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आम्ही त्यांना, तुम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घाला अशी विनंती केली. त्यावेळी त्यांनी त्यासही मनाई केली. तसेच ६ डिसें. २०२४ रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही दि. ५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रतिवर्षी प्रमाणे तथागत भगवान बुध्द यांच्या मुर्तीसमोर आणि महामानव डॉ. बाबासाहेबाच्या मुर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी सुमारे ५० ते ६० ग्रामस्थ विहाराजवळ एकत्र जमलो. यावेळी आमच्या विहाराला टाळे लावले असल्याचे दिसुन आले. याबाबत आम्ही तिथे उपस्थित असलेल्या दोन होमगार्ड आणि प्रभारी पोलिसपाटील जाधव यांना विचारणा केली असता त्यानी, ‘इन्सपेक्टर सावंत साहेबांच्या सांगण्यावरून बौद्ध विहाराला लॉक केले आहे.’ असे सांगितले. तेव्हा फोनद्वारे पोलिस निरिक्षक सावंत यांच्याशी संपर्क साधून आम्हाला, प्रांत साहेबांची ऑर्डर आहे, तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले. यावर संतप्त झालेल्या नागरिकांनी याबाबत आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर येथील नागरिक दिलीप जाधव, विलास जाधव, यशवंत जाधव, यांच्यासह येतील अन्य नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.