चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्या गटात इलेव्हन फायटर पश्चिम विभाग तर स्टार प्रीमियर लीग दुसऱ्या गटात वाशिष्ठी इलेव्हनने विजेतेपद पटकावले. या विजेत्या संघासह उपविजेते संघ व वैयक्तिक बक्षिसे मिळवणाऱ्या खेळाडूंना संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
चिपळूण बहादूरशेखनाका येथील नगर परिषदेच्या सावरकर मैदानात दोन दिवस प्रकाशझोतात स्पर्धा झाली. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते झाले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षी चिपळूण शाखांतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीदेखील ३० एप्रिल व १ मे रोजी येथील सावरकर मैदानात चिपळूण नागरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांच्या उपस्थित पार पडली.
ही स्पर्धा दोन गटात खेळविण्यात आली. चिपळूण नागरी प्रीमियम लीग या गटात ८ तर स्टार प्रीमियम लीग गटात ४ संघ सहभागी झाले होते.
चिपळूण फिटनेस क्लब आणि चिपळूण वकील संघ यांचा प्रेक्षणीय सामना दर्जेदार झाला. वकील संघातर्फे एडवोकेट विश्वास शिगवण, अजय कांबळी, सुयोग तावडे, रोहन बापट, पराग सुतार, ओमकार पालांडे, अमेय भिडे, आदेश काते, गोरक शिर्के, अमित वरवडेकर, भास्कर खराडे तर फिटनेस क्लब तर्फे गौरव शेट्ये, हेमंत कदम, निखिल वारके, विजय कदम, दीपक पवार, सिकंदर शिंदे, महेश शिंदे, वीरेंद्र रजपूत, अभिजीत शिंदे, तुषार शिंदे, विनोद चव्हाण असे खेळाडू मैदानात उतरले होते.
चिपळूण नागरी प्रीमियम लीग गटात अंतिम सामना इलेव्हन फायटर पश्चिम विभाग व रत्नदुर्ग इलेव्हन दक्षिण विभाग या संघात झाला. यामध्ये इलेव्हन फायटर पश्चिम विभागाने बाजी मारत अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले.
तर स्टार प्रीमियम लीग दुसऱ्या गटात चिपळूण रायझर व वाशिष्ठी इलेव्हन यांच्यात सामना झाला. हा सामना वाशिष्ठी इलेव्हन संघाने जिंकत दुसऱ्या गटात विजेतेपद पटकावले. यामुळे रत्नदुर्ग इलेव्हन दक्षिण विभाग व चिपळूण रायझर या दोन्ही संघाना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या सर्व विजेत्या उपविजेत्या संघांना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ अन्य मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
चिपळूण नागरी स्टार प्रीमियम लीग या गटातून रायझर संघाचा रुपेश काजवे याला मालिकावीर व उत्कृष्ठ फलंदाज, निलेश महाडिक याला उत्कृष्ठ गोलंदाज तर चिपळूण नागरी प्रीमियर लीग गटातर्फे मालिकावीर आदित्य माळी, उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून सुहास कडव, उत्कृष्ठ फलंदाज म्हणून प्रितेश महाडिक या खेळाडूंना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक प्रशांत यादव, व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, ऍड. नयना पवार, संचालक अशोकराव कदम, राजेश वाजे, सोमा गुडेकर, सत्यवान मामुनकर, गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, राजेंद्र पटवर्धन आदी उपस्थित होते.
या स्पर्धेला माजी आमदार रमेश कदम, श्रीकृष्ण वेळेकर, बशीर सय्यद, विलास सावंत- शिवरेकर, सावंत, डॉ. सुनील सावंत, जिल्हा परिषद माजी सदस्य विजयराव देसाई ,रमण डांगे तसेच चिपळूणमधील नामवंत वकील व फिटनेस क्लबचे पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली.
या स्पर्धेचे यशस्वी व नीटनेटके नियोजन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.
सावरकर मैदान खेळयुक्त बनवल्याने चिपळूण नागरीचे सर्वत्र होतेय कौतुक

चिपळूण शहरातील पवन तलाव मैदान तांत्रिक कारणास्तव उपलब्ध न झाल्याने चिपळूण नागरीने अवघ्या दोनच दिवसात बहादूरशेखनाका येथील चिपळूण नगर परिषदेचे सावरकर मैदान खेळयुक्त बनवले. यामुळे चिपळूण नागरीची शाखांतर्गत प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा होऊ शकली. दोनच दिवसात मैदान तयार केल्याबद्दल चिपळूण नागरीचे उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.
