चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील वृक्षतोडीचे प्रमाण पाहता वनविभागाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि अवैध वृक्ष तोडीवर तातडीने जरब बसेल या दृष्टीने कारवाई करावी अशी मागणी ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीने विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यानुसार ग्लोबल चिपळूण टुरिझम म्हणून जरी रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असले तरी पर्यटनाचा अविभाज्य घटक असलेली येथील वनसंपदा वाचवण्यासाठीही आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहोत. गेली दोन वर्षे आम्ही आपणास अनेक वेळा भेटून जिल्ह्यात आणि विशेषतः चिपळूण तालुक्यात चालू असलेल्या जंगलतोडीकडे आपले लक्ष वेधले होते आणि यावर कारवाईची मागणीही केली होती. परंतु आपणाकडून त्याबाबत जराही प्रतिसाद मिळालेला नाही किंबहुना जंगलतोडीला प्रोत्साहनच मिळत राहिले आहे. ही बाब खूपच गंभीर आहे.याचाच परिणाम होऊन चिपळूण तालुक्यात दसपटी विभागात गेल्या दोन महिन्यात वारेमाप जंगलतोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि या घटना नागरिकांनी उजेडात आणल्यानंतर एक दोन प्रकरणात आपणाकडून जुजबी दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी या संस्थेचे राम रेडीज, संजीव अणेराव, बापू काणे, प्रा. मीनल ओक, सज्जाद कादरी, अजित जोशी, धनश्री जोशी, पृथ्वीराज पवार, मंदार चिपळूणकर, ओवी रेडीज आदी उपस्थित होते
कुंभार्ली घाटातील पोलीस चेक पोस्टवर अवैध लाकूड वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कॉम्पुटर आणि सी सी टी व्ही कॅमेरा सन २०१० मध्ये दिलेला होता. त्याची सध्याची स्थिती काय आहे ? याचीही आपण माहिती घेऊन आम्हाला द्यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीचे वाढते प्रमाण पाहता, आपले यावर नियंत्रण नाही हेच दिसून येत आहे. आपण ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि अवैध वृक्षतोडीवर तातडीने जरब बसेल अशी कारवाई करावी, अशी मागणी ग्लोबल चिपळूण टुरिझमने निवेदनाद्वारे केली आहे.