बातम्या शेअर करा


चिपळूण – तालुक्यातील नांदिवसे गणेशपूर येथे काही दिवसांपूर्वी विनापरवाना लाकूड साठा नंतर काही दिवसांतच खडपोली येथे विनापरवाना वाहतूक करणारा लाकडाचा ट्रक वन विभागाच्या पथकाने पकडला. या दोन्ही कारवाई समोर येत असतानाच वन विभागाच्या पथकाने ओवळी येथे केलेल्या पाहणी दरम्यान वृक्षतोड झाल्याची व लाकूड साठा केलेला असल्याचे निदर्शनास येताच हा लाकूड साठा वनविभागाने जप्त केला आहे. याचबरोबर ओवळीच्या जंगलात १५ एकर क्षेत्रात वृक्षतोड झाले असल्याचे समोर आले आहे. ही वृक्षतोड जितेंद्र शांताराम शिंदे यांने केली असल्याचे निदर्शनास येत आहे. एकंदरीत या कारवाई पाहता सह्याद्रीच्या खोऱ्यात बेसुमार जंगलतोड होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सह्याद्रीच्या खोऱ्यात जंगलतोड होत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबतचे वृत्त प्रसिद्धी माध्यमात आल्यानंतर वन विभागाचे पथक खडबडून जागे झाले. यानंतर वनविभागाच्या पथकाने सह्याद्री खोऱ्यात धाडसत्र सुरू केले. यामध्ये सुरुवातीला नांदीवसे गणेशपुर येथे लाकूड साठा जप्त करण्यात आला. मंगेश मधुकर शिंदे यांनी बिगर परवाना वृक्षतोड केल्याचे समोर आले. तर ही कारवाई ताजी असतानाच खडपोली येथे विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे.

ओवळी येथे लाकूडसाठा जप्त

दरम्यान, सह्याद्रीच्या खोऱ्यात बेसुमार वृक्षतोड होत असल्याची जोरदार ओरड सुरू झाली. याबाबत निसर्गप्रेमींनी सोशल मीडियांमधून संताप व्यक्त केला. याबाबत वन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार या पार्श्वभूमीवर वन विभागाचे पथक ओवळी येथे पाहणीसाठी गेले. यावेळी ओवळी धरणाकडील स्थानिक नाव चिखलवणे येथे वृक्षतोड झाल्याची व लाकूड साठा असल्याचे निदर्शनास आले. या तोडीबाबत वन विभागाने अधिक चौकशी केली असता जितेंद्र शांताराम शिंदे उर्फ पप्या शिंदे यांने सदरची तोड केल्याचे मान्य केले आहे. सदर क्षेत्रात साठा करुन ठेवलेला ३१.२४२ घ.मी. लाकूड साठा वनविभागाने जप्त केला असून जिंतेंद्र शिंदे उर्फ पप्या शिंदे यांच्या विरुध्द महाराष्ट्र झाड तोडण्याबाबत अधिनियम १९६४ अंतर्गत वृक्षअधिकारी चिपळूण तथा परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण यामार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे. ही कारवाई १८ मार्च रोजी करण्यात आली.

ओवळीत १५ एकर क्षेत्रात जंगलतोड

याचबरोबर वन विभागाचे पथक संदेश शशिकांत शिंदे, संजय कृष्णाजी शिंदे, सरपंच दिनेश वामणराव शिंदे, पोलीस पाटील. सुनिल धोंडु शिंदे यांना सोबत घेऊन ओवळी गावातील धामणाडी धनगरवाडी पासून पुढे अंदाजे ६ किलो मिटर लाल मातीच्या कच्या रस्त्याने डोंगरात गेले. यावेळी स्थानिक नाव दातीवराडी या भागात अंदाजे १५ एकर क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे आढळूण येत असून लाकूडसाठा जागेवर आढळून आला नाही. या वृक्षतोडी बाबत गावात चौकशी केली असता जितेंद्र शांताराम शिंदे उर्फ पप्या शिंदे यांनी गावातील लोकांकडुन रान विकत घेऊन वृक्षतोड केली असलेचे पुढे निदर्शनास येत आहे.

गेल्या चार वर्षांत वन विभागाकडून जंगल तोडीवर कारवाई

या भागात आढळून आलेली वृक्षतोड ही जुन्या व ताज्या प्रकारची असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन ते चार वर्षात ओवळी व नांदिवसे या गावामध्ये सुमारे ७२० घ.मी. लाकूड साठा जप्त करण्यात आला असून तो जप्त करण्यात आलेला आहे व त्याचा लिलाव करुन १,७०,७६७ रुपये इतकी रक्कम सरकार जमा करण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here