गुहागर -( मंगेश तावडे )- गुहागर तालुक्यातील चिखली येथील खादी ग्रामउद्योगाच्या जागेवर स्थानिकांना संधी मिळत नाही मात्र त्याच जागेवर परप्रांतीय मात्र गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे हे खादी ग्रामउद्योग मंडळ नक्की कुणासाठी .? असा प्रश्न आता गुहागर तालुक्यातील तरुण युवकांमधून विचारला जातोय.
तालुक्यातील चिखली येथे खादी ग्रामउद्योग मंडळाची तीन एकर जागा आहे. या जागेवर कमी खर्चात नवतरुण युवकांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभे राहावेत यासाठी शासनाने खादी ग्रामउद्योग मंडळाला तीन एकर जागा दिली आहे. या ठिकाणी दोन गुंठ्यांपासून पाच गुंठ्यापर्यंत परिसर वाटून दिलेला आहे. या जागेमध्ये आपण छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करू शकता असा त्या मागचा उद्देश आहे. मात्र या जागेची माहिती आम्ही घेतली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला या जागेवर स्थानिकांना तर परवानगीच नाही. मात्र त्या ठिकाणी परप्रांतीय मात्र गेल्या 30 वर्षापासून ठाण मांडून आहेत त्यामुळे खादी ग्रामउद्योग मंडळ नक्की कोणासाठी असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे.
चिखली येथील या तीन एकर जागेवर परप्रांतीय बेकरी व्यवसाय करत आहे. तर इतर जागा या फकत आरक्षित आहे. आणि त्या इतर कुणालाही देता येणार नाही असे गुहागर तालुका खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विजय लांजेकर यांनी सांगितले.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जर तीन एकर जागा असेल तर या जागेवर परप्रांतीयांची बेकरी कशी.? असा प्रश्न ज्यावेळी लांजेकर यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी मी नुकताच अध्यक्ष झालेला आहे. याबाबत तुम्ही जुन्या अध्यक्षांना विचारा असं मार्मिक उत्तर दिलं त्यामुळे स्थानिक उपाशी आणि परप्रांतीय तुपाशी असाच काहीच प्रकार या ठिकाणी सुरू असल्याचा दिसत आहे.
गुहागर- चिपळूण मार्गावरील चिखली येथे रस्त्याकडेला ही तिन एकर जागा आहे. अत्यंत मोक्याच्या क्षणी असलेली ही जागा ओसाड आणि पडीक आहे. याबाबत विचारणा केली असता ही जागा आरक्षित आहे. असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे गुहागर मधील सुज्ञ जनतेने ,लोकप्रतिनिधींनी ,पुढारी वर्गाने आणि तरुण वर्गाने याबाबत जाब विचारून स्थानिकांसाठी असलेल्या या जागेवरून परप्रांतीय हटाव ही मोहीम हाती घेतली पाहिजे.