गुहागर – शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव हे उद्या सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असून शिवसेनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.
याशिवाय या भागातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत.सकाळी १०.३० वा. औंढा येथील नागनाथ महादेव मंदिरामध्ये अभिषेक करून ते या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर नांदेड नाका, हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. सभेनंतर या भागातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही ते स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत.शिवसेना पक्ष अडचणीत असताना आमदार भास्करराव जाधव हे शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अत्यंत आक्रमकपणे एकाकी लढा देत आहेत आणि संघर्ष करीत आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवेधनादरम्यान एकीकडे विधानसभेत विरोधकांवर तुटून पडताना मुंबईत ठिकठिकाणच्या सभांमध्ये त्यांनी संभ्रमावस्थेत असलेल्या शिवसैनिकांमध्ये नवी जान आणली. काही दिवसांपूर्वी उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची शिवसेना नेतेपदी वर्णी लावल्यानंतर तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना सभांसाठी आग्रह केला जात आहे. त्यातूनच त्यांचा उद्याचा मराठवाड्याचा दौरा होत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे या भागातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.