चिपळूण – चिपळूण तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसला असुन आज दुपारी पुन्हा एकदा दरड कोसळल्याने हा घाट आता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आधी शनिवारी रात्री दरड कोसळल्याने हा घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा आज पावसाचा जोर वाढताच दरडीची माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी ४.३० वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते चिरणी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.या परशुराम घाटातील दरडीची माती हळूहळू खाली घसरत असल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीनी तात्काळ परशुराम घाटात धाव घेऊन पाहणी केली व सायंकाळी ४.३० वाजलेपासून घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. पाऊस थांबल्यानंतर सकाळी एकदा घाटाची पाहणी केली जाईल आणि मगच पुढचा निर्णय घेतला आहे.