चिपळूण – आगामी नगर परिषद निवडणूक काँग्रेसतर्फे स्वबळावर लढविण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यातूनही सन्मानजनक जागा मिळाल्यास पारंपारिक मित्र असलेला राष्ट्रवादी काँग्रेस व वेळ पडल्यास शिवसेनेसोबत आघाडी केले जाईल.
काँग्रेसकडे दोन-तीन प्रभागाचा अपवाद वगळता सर्व प्रभागात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असून, आम्हाला निवडणुकीसाठी पोषक वातावरण आहे, असे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले.चिपळूण येथील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष यादव म्हणाले की ही निवडणूक आम्ही शक्यतो स्वबळावर लढणार आहोत. तशी भूमिका अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. त्यादृष्टीने सर्व प्रभागात तयारी केली जात आहे. प्रत्येक प्रभागातील चूक उमेदवाराची नावेही घेतली जात आहे. सध्या सुमारे पंचवीस इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये, यासाठी पारंपरिक मित्र असलेला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीसाठी चर्चा केली जाईल. नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. शिवसेनेनंतर काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळणे आवश्यक आहे. अपेक्षित जागा मिळाल्या तरच आघाडी होऊ शकते. अन्यथा आमची आत्तापासून स्वबळावर वाटचाल सुरू आहे.नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी अशी महा विकास आघाडीची शक्यता कमी आहे. शिवसेनेकडून चांगल्या जागांचा प्रस्ताव आल्यास त्याचाही विचार केला जाईल. भाजपचा पर्याय मात्र स्वीकारला जाणार नाही. यापूर्वी नगर परिषदेत राजकीय अपरिहार्यता म्हणून, भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. आता मात्र भाजप सोबत आम्ही जाणार नाही. शहरात भाजपने दिवाळखोरीचा कारभार केलेला आहे. अनेक वाईट व नागरिकांच्या हिताच्या विरोधी प्रस्तावांना आणि कामांना काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतली. आमचे नगरसेवक स्वच्छ चारित्र्याचे आहेत असेही ते म्हणाले. त्यावेळी शहराध्यक्ष लियाकत शाह, सुधीर शिंदे, सुरेश राऊत, अन्वर तबले, गुलजार भरवले, शकील तांब, अशोक भुस्कुटे, करामत मीठागरी, शौकत कादरी, सफा गोठे, दीपक निवाते आदी उपस्थित होते.