प्राध्यापकांना उन्हाळी सुट्टी फक्त कागदावरच….. मंत्री सामंत यांच्या आदेशाला केराची टोपली……?

0
182
बातम्या शेअर करा

लातूर – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने प्राध्यापकांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदरील सुट्ट्या या 25 मे पासून सुरू होणार असून, 12 जून पर्यंत असतील असे परिपत्रकात नमूद आहे. मात्र, या सुट्ट्या केवळ नावालाच आहेत. कारण, एकीकडे सुट्ट्या जाहीर केल्यात तर दुसरीकडे 31 मे पर्यंत प्रोजेक्ट, अंतर्गत गुण परीक्षा घेऊन गुणयाद्या सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे. शिवाय, 2 जूनपासून विद्यापीठ परीक्षा सुरु होत आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या प्राध्यापकांना सुट्ट्या मिळणार की नाहीत असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली आदी जिल्ह्यातील महाविद्यालये चालतात. विद्यापीठाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून, यामध्ये प्राध्यापकांना 25 मे पासून ते 12 जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकीकडे या सुट्ट्या जाहीर केल्या असताना दुसरीकडे 31 मे पर्यंत प्रोजेक्ट, प्रात्यक्षिक घेऊन अंतर्गत गुणयाद्या सादर करण्यास सांगितले आहे. शिवाय, 2 जूनपासून विद्यापीठ परीक्षा सुरु आहेत.
31 मे पर्यंत गुणयाद्या सादर करायच्या असतील तर प्राध्यापकांना महाविद्यालयात जावेच लागेल, तसेच 2 जूनपासून परीक्षा विभाग आणि पर्यवेक्षण ड्युटी करावी लागणार आहे. मग सुट्ट्या फक्त नावालाच असणार आहेत का? असे प्राध्यापक बोलत आहेत. विद्यापीठ परीक्षा ड्युटी करणे बंधनकारक असल्याने यंदा प्राध्यापक उन्हाळी सुट्ट्याना मुकणार आहेत. विद्यापीठ परीक्षा या 2 जूनपासून 15 जुलैपर्यंत चालणार आहेत. मध्येच बारावीचा निकाल लागणार असून, प्राध्यापकांना प्रवेशाची कामेही करावी लागणार आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्ट्या असून नसल्यासारख्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा या सुट्टीच्या कालावधी मध्ये घेऊ नयेत असे आदेश दिले असताना सुद्धा स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत परीक्षा सुट्टीच्या कालावधीत घेत असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधून संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येतं आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here