चिपळूण – गेल्या चार महिन्यांपासून वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असला तरी हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी किनाऱ्यावरच आहे.
हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराला त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गतवर्षी आलेल्या महापुरामुळे चिपळुरात कोट्यवधींचे नुकसान झाले. अतिवृष्टी, कोयनेचे अवजल आणि समुद्राला आलेली भरती या कारणाने येथे महापूर आला. यामध्ये ९० टक्के शहर पाण्याखाली गेले. यानंतर नागरिकांमध्ये उठाव निर्माण झाला. वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढावा, या मागणीला जोर धरला. अखेर नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने गाळ काढण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले.जानेवारी महिन्यापासून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, अद्याप ते पुर्ण झाले नसून पन्नास टक्केच गाळ काढण्यात आला आहे. काढलेला गाळ अनेक ठिकाण वाशिष्ठी नदीच्या काठावरच रचून ठेवलेला दिसत आहे. यामुळे अतिवृष्टीत गाळ पुन्हा नदीत पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा उपयोग काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.चिपळूण बचाव समितीने बेमुदत उपोषण करून पूरप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. केंद्रस्तरापर्यंत पाठपुरावा करण्यात आला. शासनाने गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, मात्र त्यानंतर बचाव समितीची पकड ढिली झाली आहे. या कामाचा आवश्यक तेवढा पाठपुरावा समितीकडून झाला नसल्याचे त्या कामातून पुढे येत आहे. काम ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. त्यातही वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पात्रालगत अनेक ठिकाणी गाळ किनाऱ्यावरच ठेवलेला दिसत आहे. कोकणातील पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पहिल्या दोन चार पावसातच हा गाळ पुन्हा नदीत जाईल आणि तसे झाल्यास पुराची टांगती तलवार कायम राहील. नाम फाऊंडेशनचाही उत्साह मावळलानाम फाऊंडेशनने मोठ्या उत्साहाने शिवनदीतील गाळ काढण्याचे काम सुरु केले. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांचा हा उत्साह काहीसा मावळला आहे. दोन्ही कामांकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे नदीकिनारी अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. तो नेण्यासाठी कोणी तयार नाही व शहर परिसरात गाळ टाकण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी कारणे सांगितली जात आहेत.किनाऱ्यावरील जागा मालकांचा फायदावाशिष्ठी व शिवनदीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम झाले असले, तरी प्रत्यक्षात काढलेला गाळ पुन्हा नदीपात्रात जाणार आहे. त्यामुळेच चिपळूणचा पुराचा धोका टळेल की नाही याबाबत आता तरी कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. परंतु पूरबाधित क्षेत्रात गाळ टाकण्यास बंदी असताना काही ठिकाणी किनाऱ्यावरच गाळ टाकल्याने काही शेत मालकांचा मोठा फायदा झाला आहे.