खेड – कोकणात रत्नागिरी जिल्हयात चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी डॅममध्ये चार जण बुडाले तर, दोघांचा मृत्यू झाला. या घटनेला आठवडा होत नाही, तोच खेड तालुक्यातील कोंडिवली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले असताना सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात दहा वर्षाच्या सुहान चौगुले हा मुलगा,तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय वय असलेला त्याचा चुलता इम्रान याकुब चौगुले या दोघांचाही मृत्यू झालाय. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह रात्री उशिरा मिळाले आहेत. या घटनेत सुदैवाने अजून दोन लहान मुले दैव बलवत्तर म्हणून पाण्याबाहेर राहिल्याने बचावली आहेत. ही ह्रदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी उशिरा ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खेड तालुक्यातील निळीक वरचीवाडी येथील इम्रान याकूब चौगुले (४०) आणि सुहान फैजान चौगुले (१०) व मुलगी लाईबा वय ८ व मुलगा याकूब वय ४ हे चौघेजण कोंडिवली डॅमवर फिरण्यासाठी गेले होते. या डॅमवर सेल्फी घेण्यासाठी सुहान हा पाण्यात उतरला व याचवेळी दुर्देवाने त्याचा पाय घसरला व तो बुडत असल्याचे लक्षात येताच इम्रान याकूब चौगुले हे वाचवण्यासाठी गेले मात्र दुर्देवाने दोघेजण बुडाले. असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी धरणावर धाव घेतली. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ खेड पोलिसाना या घटनेची माहिती दिली. खेड पोलिसांनी तात्काळ कोंडिवली धरणावर धाव घेत धरणात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यास सुरवात केली. धरणात मोठ्या प्रमाणात असलेले पाणी व महाकाय मगरींचा वावर यामुळे शोध घेण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र पोलिसांनी शोधकार्य सुरूच ठेवले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धरणातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आहे. पोलीस तपासात हा प्रकार सेल्फी काढताना घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.या प्रकरणी अधीक तपास खेडचे प्रभारि पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करत आहेत.