खेड – खेड येथील डाकबंगला परिसरात गेली २२ वर्षा पासून असणाऱ्या चर्मकार समाजाचा खोका उडवून तेथे बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोक्यांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी उपोषणकर्ते उमेश खेडेकर आणि सीमा जाधव यांना दिले आहे.
उमेश खेडेकर यांनी खेड नगरपालिकेत रीतसर अर्ज करून सन २००० साली चर्मकार व्यवसाय डाकबंगला येथील नगरपालिकेच्या जागेत सुरू केला. त्यासाठी गटई कामगारांना समाजकल्याण विभागातून मिळालेल्या खोक्यामध्ये ते आपला व्यवसाय करीत होते. २० डिसेंम्बर २०२१ पासून त्यांच्या मागील बाजूस जमीन असणारे अलिखान दऱ्याखान महाडिक आणि एजाज महाडिक यांनी त्यांच्या जागेत विनापरवाना खोके बांधून खेडेकर यांचा खोका तोडून लपविण्याचा प्रकार केला, याबाबत पोलिसांनी देखील तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. याबाबत चे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.
तर खेड तालुका रोहिदास समाज सेवा संघ, रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघ, आणि खेड शहर रोहिदास समाज सेवा संघाने सदर उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच समाजातील अनेक नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाठिंबा दिला.
उपोषणस्थळी खेडचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, इंजिनियर रविकिरण सुरवसे, कार्यालयीन निरीक्षक जाधव, वरिष्ठ लिपिक बोंडले यांनी चर्चा करून संबंधित जागेत उभ्या केलेल्या गाळ्यांवर कारवाई करण्यात येईल असे पत्र देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली, यामुळे उमेश खेडेकर आणि सीमा जाधव यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले, परंतु याउपरही न्याय न मिळाल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनातच आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.