कणकवली – भाजप आमदार नितेश राणे यांना आजही दिलासा मिळाला नाही. नितेश राणे त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश यांना 18 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. नितेश यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात कोठडीवर सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. त्यामुळे नितेश राणे यांची अडचण वाढली आहे.
नितेश राणे यांना आज दुपारी सिंधुदुर्ग कोर्टा आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद झाला. यावेळी पोलिसांनी नितेश राणे यांची 8 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाला का याचा तपास करायचा आहे. नितेश यांना पुण्याला न्यायचं असून अजून काही गोष्टींचा तपास करायचा आहे, त्यामुळे नितेश यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी केली.