सांगली – सांगली परिसरात ठिकठिकाणी घरफोडी करून घरगुती साहित्यासह सायकलची चोरी करणाऱ्या दोघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली. विनायक रामा पाटील व साजिद अल्ताफ सारवान अशी दोघा संशयितांची नावे आहेत. सुमारे एक लाख दहा हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल “त्या” दोघांकडून जप्त करण्यात आला. यांच्या व्यतिरिक्त अन्य दोघां अल्पवयीन संशयितांचा समावेश प्रकरणात आढळत आहे. प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १४ ऑक्टोबर २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२१ कालावधीत सहारा फॅब्रिकेशन जुना बुधगाव रोड (कुपवाड) याठिकाणी कारखान्यातून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याची फिर्याद फरदिन दस्तगीर मकानदार ठाण्यात दिली होती. यानंतरच्या तपासा दरम्यान दोघा संशयितांचा सुगावा पोलिसांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत लागला. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत “त्या” दोघांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच दोघा अल्पवयीनांचा यामध्ये सहभाग आढळला. त्यांच्याकडून एलईडी टीव्ही, लोखंडी मशीन, दोन गॅस सिलिंडर, सीसीटीव्ही कॅमेरे, प्लास्टिक खुर्च्या, मोबाईल, गाद्या अशा घरगुती असा एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कारवाईनंतर मिरजेचे उपविभागीय अधिकारी अशोक वीरकर यांनी कुपवाड पोलिस ठाण्यास भेट देऊन कारवाईबाबत पोलिसांचे अभिनंदन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील व उपनिरीक्षक तुषार काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली. उपनिरीक्षक महादेव जठार, हवालदार शिवानंद गावाणे गजानन जाधव, संदीप पाटील, नाईक सतीश माने, अनुष्का पाटील, शैलज गावडे, शिवाजी ठोकळ, यांनी सहभाग नोंदवला