गुहागर – “जे नसे ललाटी, ते करे तलाठी ” या म्हणीचा प्रत्यय सध्या गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे तलाठी कार्यालय बांधकामाबाबत घडून आला आहे. गुहागर बांधकाम विभागाने सुमारे सहा लाखाचे अंदाजपत्रक या कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी मंजूर केले आहे. एवढी रक्कम खर्ची करीत असताना बांधकामासाठी थप्पी ऐवजी कोडी दगडी भिंत घालण्यात येत असल्याने येथील नागरिकही संभ्रमात पडले आहेत. हे बांधकाम ठेकेदारासह अधिकारी यांना चांगलेच निस्तरावे लागणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
गुहागर तालुक्यातील एकमेव असलेली पाटपन्हाळे तलाठी कार्यालयाची जुनी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. महसूल विभागाची जागा असली तरी इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने निधी कसा उभा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. गेली 4 वर्षे ही इमारत दुरुस्तीविना धूळखात पडली होती. परिसरात झाडी-झुडपे वाढलेली व एका बाजूला निर्जनस्थळी असल्याने जणूकाही हे कार्यालय वनवासच भोगत आहे असे अनेकांना वाटायचे. पाटपन्हाळे तलाठी कार्यालयाचा कारभार आजतागायत भाड्याच्या खोलीत सुरु आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधावी यासाठी येथील नागरिक सतत पाठपुरावा करीत होते. अखेर 8 दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष जागेवर येऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुन्या कार्यालयाची पाहणी केली व 6 लाखाचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले होते. अखेर याला मूर्त रुप येऊन जुनी इमारत पाडून येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले.या इमारतीचे बांधकाम तळाचे जोते जुनेच ठेवण्यात आले आहे व तिच्या भिंती कोडी दगडाच्या घातलेल्या दिसून येत आहेत. इमारत बांधताना कोणतेही डिझाईन झालेले नसल्याचे समोर येत आहे. या बांधकामाची निविदाही प्रसिध्द झालेली नसल्याचे बोलले जात आहे. अशापध्दतीने शासकीय इमारतीचे बांधकाम होणे म्हणजे संशयकल्लोळ व्यक्त करण्यासारखाच आहे. 6 लाखाचा निधी मंजूर असताना पक्के बांधकाम का नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे. शृंगारतळी-गुहागर मार्गावर पाटपन्हाळे बसथांब्याजवळच या तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणारे नागरिक हे तलाठी कार्यालय आहे की, बसथांबा अशी खुमासदार चर्चा करताना दिसून येत आहेत.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/20200823_193853-1024x1024.jpg)
. पाटपन्हाळे गावातील महामार्गावरील तलाठी कार्यालयाचीच्या इमारती चे बांधकाम योग्यरीतीने झालेच पाहिजे याकामी ग्रामस्थांच्या बरोबर मी खंबीरपणे उभा असेन.- सरपंच पाटपन्हाळे ..संजय पवार