गुहागर- गुहागर नगरपंचायत वर सध्या शहरविकास आघाडीची सत्ता आहे. या आघाडीचे नगराध्यक्ष, तसेच आघाडीचे काही नगरसेवक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रम आणि विविध उपक्रमांत सहभागी होतात. अनेक वेळा याआधी झालेल्या अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या गुहागर मधील आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांची अशी भावना होती. की शहरविकास आघाडी मधील सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करावा व नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर करावी तसेच आमच्या पक्षाच्या तिकीटावर सलग दोन वेळा निवडून आलेल्या सौ.सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद मिळावे अशी गुहागर मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. आणि त्यासंबंधी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याआधीच आमची चर्चा आणि कार्यकर्त्यांची इच्छा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या कानावर घातलेली आहे.
एकीकडे गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमात सक्रिय होतात. मात्र त्याच वेळी गुहागर शहरात आपली शहरविकास आघाडी अबाधित कशी राहील यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यामुळे त्यांनी त्यांची नेमकी भूमिका काय आहे.? ते गुहागरच्या जनतेला सांगावी.
गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर यांच्यासोबत त्यांच्या व्यासपीठावर काम केले. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीशी घरोबा करायचा आणि दुसरीकडे त्याच राष्ट्रवादीला नगरपंचायती मधील महत्त्वाच्या पदापासून दूर ठेवायचं अशा त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभ्रम निर्माण झाले असून त्यांनी आपली दुपट्टे भूमिका बंद करून आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस मधून केली जात आहे.