गुहागर ; चिरेखाण मातीतून सुबक गणेशमूर्तीं साकारणारा अवलिया – सुभाष पडवेकर

0
291
बातम्या शेअर करा

गुहागर – प्रत्येक कलाकार हा आपली कलाकृती त्याला सुचेल, रुचेल अशा पध्दतीने साकारत असतो. आपल्या बुध्दीमत्ता व कल्पकता याच्या जोरावर तो कलाकार सर्वकाही साध्य करीत असतो. अशाच एका गणेशमूर्तीकाराने आपल्या कल्पकतेने प्लास्टर आँफ पँरीस व महाग असणाऱ्या शाडूच्या मातीला थोडाफार फाटा देत चिरेखाणीच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या आहेत. गेली 3 वर्षे हा त्यांचा प्रयत्न यशस्वीरिक्या सुरु असून अनेक गणेशभक्तांनी या मूर्तींना आपली पसंती दर्शविली आहे. 

गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील गणेशमूर्तीकार सुभाष पडवेकर गेली 25 वर्षे आपल्या गणेशमूर्ती शाळेमध्ये केवळ एक आवड म्हणून गणेशमूर्ती साकारत आहेत. सुरुवातीपासूनच ते गणेशभक्तांच्या पसंती व आवडीनुसार शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करतात. शाडूची माती ही दिवसेंदिवस महाग होत असल्याने व विविध रंगांचे दरही वाढत चालल्याने गणेशमूर्तीं गणेशभक्तांना परवडत नसल्याचे पडवेकर यांनी सांगितले. ज्यांच्या गणेशमूर्ती मोठ्या आकाराच्या आहेत त्यांना पीओपीच्या मूर्ती आम्ही देत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर एक अनोखी युक्ती पडवेकर यांना सापडली. त्यांनी जांभा दगडासाठी खोदलेल्या व रिकाम्या झालेल्या चिरेखाणी शोधून त्यातून माती आणली. या मातीपासून पडवेकर यांनी सुरुवातीला दोन गणेशमूर्ती साकारल्या. या लाल मातीच्या मूर्तीवर रंगकामही अधिक सुबक दिसू  लागले. त्यामुळे पडवेकर यांचा आत्मविश्वास दुणावला व त्यांनी चिरेखाणीच्या मातीपासून मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. गेली 3 वर्षे अशा पध्दतीच्या मूर्ती ते साकारताना दिसत आहेत.चिरेखाणीची माती ही खोलवर जमिनीत चिकट स्वरुपात असते हे पडवेकर यांना माहित होते. तसेच शाडूच्या मातीसारखीच चिरेखाणीची माती पाण्यात चटकन विरघळते. मूर्तीचे विसर्जन झाल्यावर मूर्तीचे त्वरीत विघटन होते. त्यामुळे पडवेकर यांना अशा मातीपासून मूर्ती बनविण्याची कल्पना सुचली व त्यांनी सत्यात उतरवली. यावर्षी त्यांनी चिरेखाणीच्या मातीपासून अनेक प्रकारच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. यावर्षी कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद होती. त्यामुळे वेळेत शाडूची माती गणेशमूर्ती बनविण्यासाठी पडवेकर यांना मागविता आलेली नाही.  त्यामुळे त्यांनी यावर्षी  चिरेखाणीच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याला प्राधान्य दिले. कोरोनामुळे सोशल डीस्टींगचे नियम पाळण्यासाठी पडवेकर यांनी यावर्षी गणेश चतुर्थीच्या एक आठवडाभरापूर्वीच गणेश मूर्तींचे रंगकाम उरकले आहे. जेणेकरून या आठवडाभरात गणेशभक्तांना आपली पसंतीनुसार मूर्ती नेण्यास वेळ मिळणार आहे. तसेच गर्दी न करता सोशल डीस्टींगचा नियमही पाळता येणे सोपे होणार आहे. गणेश मूर्तींचे रंगकाम पूर्णतः झालेले आहे. अनेक हौशी गणेशभक्त चित्रशाळांमध्ये येऊन आपली गणेशमूर्ती पसंत करताना दिसत आहेत. बाल गणेशमूर्ती, विविध प्रकारच्या शैलीमध्ये, चित्रांमध्ये असलेल्या मूर्ती गणेशभक्तांचे चित्त वेधून घेत आहेत. यामध्ये चिरेखाणीच्या मातीने बनविलेल्या मूर्तींना अधिक पसंती मिळत असल्याचे पडवेकर यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here