चिपळूण – चिपळूण पंचायतसमितीच्या नियोजित अशा आढावा बैठकीत अनेक मुद्दे मी उपस्थित करणार असल्याने ही सभा जाणून-बुजून रद्द केल्याचा आरोप चिपळूण पंचायत समितीच्या सदस्या अनुजा चव्हाण यांनी केला त्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या पंचायत समितीच्या सभापती वर केलेल्या आरोपाने एकच खळबळ माजली आहे. या आरोपाने चिपळूण मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून संपूर्ण चिपळूण तालुक्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे. केलेले आरोप खरे आहेत.? की अन्य काही कारण आहे. याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
लॉकडाऊन झाल्यापासून चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा घेण्यात आली नव्हती मात्र या मासिक सभेचे आयोजन 10 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. अचानकपणे ही सभा कोरोनाचे कारण पुढे करून रद्द करण्यात आल्याने आणि याबाबत शिवसेनेचे गटनेते राकेश शिंदे यांना याची साधी कल्पनाही देण्यात आली नसल्याने आणि सदस्यांना विश्वासात न घेता ही सभा रद्द झाल्याने एकच खळबळ उडाली त्याला कारणही तसंच होतं. जर ही नियोजित सभा झाली असती तर या सभेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणार होते. या प्रश्नांना उत्तर मिळाले असते की नाही किंवा या प्रश्नांमुळे कोणी अडचणीत आले असते काय हे सगळ टाळण्यासाठीच ही सभा रद्द केल्याची चर्चा आता चिपळूण तालुक्यात रंगू लागली आहे.या सभेत पंचायत समितीच्या सेस फंडातून पाच टक्के निधीतून दिव्यांगाना घरघंटी शिलाई मशीन खरेदीचा विषय गाजला होता त्या विषयाचे पुढे काय झाले तसेच महत्त्वाचा असा खडपोली येथील औद्योगिक वसाहतीतील एका गोदामात अंगणवाड्यांना पुरवठा करणारा निकृष्ट धान्यसाठा या प्रकरणात नक्की काय कारवाई झाली. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बसची सुविधा कशी करण्यात आली आहे. याबाबत चर्चा होणार होती मात्र यातील काही चर्चा या सदस्यांना किंवा या संदर्भात असणाऱ्या इतरांना अडचणीचे ठरत होत्या. त्यामुळेच ही सभा रद्द करण्यात आल्याचा आरोप रामपुर पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण यांनी केल्याने या आरोपामुळे एकच खळबळ माजली असून चिपळूणातील महाविकास आघाडीतील हे युद्ध अजून किती दिवस चालणार याची चर्चा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.