मुंबई – लॉकडाऊनच्या या कालावधीत एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्याचा परिणाम त्यांच्या पगारावर झाला त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून एस.टी. कर्मचा-याचे वेतन थकले आहे मात्र आज राज्य शासनाने एस.टी. कर्मचा-यांच्या वेतनाकरीता ५५० कोटी रूपयांचा निधी सवलत मुल्यांचा प्रतिपूर्तीपोटी अग्रीम म्हणून दिलेले आहेत. सदर रकमेतून एसटी कर्मचा-यांचे माहे मार्च महिन्याचे २५%, मे महिन्याचे ५०% व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात येणार आहे
ज्या कर्मचारी वर्गाचे भारतीय स्टेट बँक या बँकेत खाते आहे अशा कर्मचा-यांचे वेतन (CMP) प्रणालीव्दारे आज त्यांच्या खात्यात जमा होतील. ज्या विभागातील वेतनाबाबत पूर्ण तयारी नसल्यास अथवा त्यांच्याकडे तांत्रिक अडचणी असल्यास अशा विभागाचे उद्या किंवा सोमवारपर्यंत पगार होणार आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक लि., मुंबई या बँकेत पगार खाते असतील अशा कर्मचा-यांचे वेतन सोमवारी होतील. एस.टी. कर्मचा-यांचे शासन निर्णयानुसार माहे मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन दिलेले होते. परंतु संदर्भ क्र. ४ अन्वये महाराष्ट्र शासनाने माहे मार्च २०२० चे उर्वरीत वेतन दुस-या टप्प्यात प्रदान करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार माहे मार्च २०२० चे उर्वरीत २५ टक्के वेतन व माहे मे महिन्याचे वेतन ५० टक्के देणे बाकी आहे. तसेच जून महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या मुलभूत गरजा भागविणे अशक्य झालेले आहे.