गुहागरमध्ये अवतरल्या जुन्या, वापरलेल्या शिवशाही,नव्या बसच्या घोषणा हवेत..?

0
180
बातम्या शेअर करा

गुहागर – नव्या बसच्या प्रतिक्षेत असलेल्या गुहागर एसटी आगाराला दुसऱ्या आगाराने वापरलेल्या शिवशाही बस पाठविल्या जात आहेत. या बस अतिशय खराब असून कोणत्याही क्षणी बंद पडतील अशा अवस्थेत असल्यासारख्या दिसून येत आहेत. गुहागर आगार रत्नागिरी जिल्ह्यात प्रगतीपथावर असूनही त्यांच्या नशिबी जुन्या बस आल्याने आगार व्यवस्थापाने विभागीय एसटी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

गुहागर एसटी आगार जिल्ह्यात प्रगतीपथावर असल्याबद्दल गेल्याच आठवड्यात झालेल्या प्रवासी दिनात तेथील आगारप्रमुख व अधिकाऱ्यांचा जिल्हा विभागीय नियंत्रकांकडून सन्मान करण्यात आला. मात्र, या सन्मानाचे कोडकौतुक काही दिवसांतच हवेत विरल्याचे दिसून आले. या आगाराला जुन्या वापरलेल्या शिवशाही बस पाठविण्यात आल्या आहेत. चिपळूण, लांजा या आगारांच्या दोन बस गुहागर आगाराच्या कार्यशाळेत दुरुस्तीसाठी दाखल झाल्या आहेत व त्या गुहागर आगाराने वापराव्यात असे आदेश असून लांब पल्ल्यासाठी या बस कुचकामी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आणखी चार बस पाठविण्यात येणार असल्याची माहिती कार्यशाळेतून मिळाली आहे.

दरम्यान, गुहागर आगाराला गेल्याच महिन्यात ५ नव्या लालपरी बस मिळाल्या. या बसच्या शुभारंभप्रसंगी आणखी नव्या बसची मागणी करण्यात आली असल्याचे आगारप्रमुखांनी जाहीर केले होते मात्र, नव्या बसेसच्या ऐवजी जुन्या वापरलेल्या शिवशाही बस आगारात पाठविल्या जात असल्याने अनेकांनी यावर टीका केली आहे.

इतर आगारांमधून वापरलेल्या या जुन्या शिवशाही बस चिपळूण-गुहागर मार्गावर वापरल्या जाणार असल्याचे समजते. मात्र, अशा वातानुकुलित बसमधून प्रवास करणे सर्वसामान्य प्रवाशांना शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत असून याचा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर होणार असल्याचे बोलले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here