ठाणे- शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीतील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद मठाजवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेना शिंदे गटाचे उपरण घातलं आणि राजन साळवींचा शिंदे गटाचा प्रवेश झाला. राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत आणि राजन साळवी उपस्थित होते. “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं राजन साळवी यांनी या बैठकीनंतर म्हटलो होते.
यावेळी राजन साळवी यांनी ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,’ असे राजन साळवींनी म्हटले. रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे.