देवरुख – देवरुख क्रांतीनगर विभागातील अपार्टमेंट मध्ये टेरेसवरील पाण्याच्या टाकीत सोमवारी रात्री महिलेचा मृतदेह आढळून आला.अंगावरील दागिन्यांच्या चोरीसाठी हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज देवरुख पोलीसांनी व्यक्त केला.
शारदा दत्तात्रय संसारे (८०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शारदा आणि त्यांचा मुलगा दिपक दत्तात्रय संसारे या अपार्टमेंट मध्ये रहात होते. सोमवारी सकाळी ९.३० वाजता फिर्यादी दिपक संसारे हे कामासाठी घराबाहेर पडुन गेले होते.दुपारी दिपक संसारे हे घरी परतले तर ब्लाॅकला कुलुप होते.दिपक यांनी आईचा शोध घेतला , फोनाफोनी केली तरी त्यांना आईचा ठावठिकाणा लागला नाही. यामुळे दिपक संसारे यांनी सहकार्या मदतीने कुलुप तोडले.मात्र आईचा शोध काही लागला नाही. संध्याकाळपर्यंत दिपक यांनी आईचा शोध घेतला. रात्री घरी आल्यावर बाथरुम मध्ये हातपाय धुवायला गेल्यावर लालरंगाचे मिश्रित पाणी नळातुन आल्यावर दिपक यांची पाचावर धारण बसली.दिपक संसारे यांनी सहकार्याच्या मदतीने लगेच टेरेसवर धाव घेतली व पाण्याच्या टाकीत दिपक यांना साडी दिसुन आली. यावेळी आईच्या कपाळावर जखम दिसुन आली व अंगावरील दागिने चोरुन नेल्याचे दिसुन आले.यामध्ये हातातील पाटल्या, गळ्यातली माळ व कानातील कुडी गायब झाल्याचे निदर्शनास आले. हि बाब दिपक संसारे यांनी देवरुख पोलीसांना कळवली. देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली व तपासाची सुत्रे वेगाने हलवली.मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. देवरुख सारख्या सुसंस्कृत शहरात खूनासारखी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.घटनेचे गांभिर्य ओळखुन तपास तीन टप्प्यात सुरु झाला.रत्नागिरी पोलीस उपविभागिय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी घटनास्थळी ठसे तज्ञ,श्वानपथक व फाॅरेन्सिक लॅब तज्ञ दाखल झाले व तपास सुरु केला.श्वान बिल्डिंग परिसरातच घुटमळला. अज्ञाताविरुद्घ भा.द.वी.क. ३०२, २०१, ३९४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागही तपास करत आहे.आता देवरुख पोलीस आरोपीच्या मुसक्या कधी आवळणार या प्रतिक्षेत नागरीक आहेत.