चिपळुणात पहिल्याच दिवशी २२८ शाळांमध्ये घंटा वाजली

0
51
बातम्या शेअर करा

चिपळूण – शासनाने आता दि. ४ ऑक्टोबर पासून इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर चिपळूण तालुक्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत कोरोनाचे नियम पाळून पहिल्या दिवशी २२८ शाळा सुरू झाल्या आहेत.

चिपळूण तालुक्यातील सर्व शाळा गेल्या दीड वर्षाने सुरू झाल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी इरनक यांनी स्वत: काही शाळांना भेट देत पाहणी केली आहे. त्यामुळे आता शाळेची घंटा वाजली असून शैक्षणिक प्रवास सुरू झाला आहे.
कोरोनामुळे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि निर्माण झालेली बिकट परिस्थिती यात मुलांचे शैक्षिणक वर्षे वाया गेले. ऑनलाईन अध्ययन शहरी भागात सुरू होते. मात्र, ग्रामीण भागात याचा फायदा मुलांना नेटवर्कमुळे घेता आला नाही. मात्र, आता शासन निर्णयानुसार दि. ४ ऑक्टोबरपासून इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यत शाळा सुरू केल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद, माध्यमिक व विनाअनुदानित २२८ शाळांमध्ये किलबिलाट सुरू झाला आहे. काळ्या फळ्यावर आता खडूने कामकाज करताना शिक्षकांनासुध्दा अध्यापन करताना आनंद मिळत आहे. तालुक्यात एकूण ४५ हजार ७४१ विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यतचे ३१ हजार ७०७ विद्यार्थी अध्ययनाचा लाभ घेणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये मुलांची उपस्थिती उत्तम असल्याने मुलांनासुध्दा शाळेत येण्याची घाई लागल्याचे दिसून आले. गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक यांनी तालुक्यातील रामपूर हायस्कूल, मार्गताम्हाणे हायस्कूल, रेहेळ भागाडी व जि.प. मालघर नंबर १ या शाळांना भेट देत पहिल्या दिवशी पाहणी करीत मुलांचे स्वागत केले. सर्व केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी सुध्दा आपल्या प्रभागातील शाळांना भेटी दिल्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षकांनी मुलांना शिकवायचे आहे. तालुक्यात शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये बैठकीची व्यवस्था असल्याचे माहिती गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक यांनी दिली. प्रत्यक्ष शाळेत शिकताना खूप महिनांनंतर मुलांना अध्ययनाचा लाभ घेता येणार आहे. शाळेपासून वंचित असणारी मुले आता शाळेच्या आवारात बागडणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक शाळेत मुलांच्या आरोग्याची काळजी घेत शाळा सुरू ठेवल्या जाणार आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आता पालकसुध्दा पुढे सरसावले आहेत. त्यामुळे शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या निणर्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here